तुम्ही आनंदी असाल तर तुम्ही आनंद द्याल- डॉ अपर्णा अष्टपुत्रे

जाफराबाद/विशाल देशमुख,दि.13
आपल्याकडे जे असते ते आपण दुसऱ्याला देत असतो या न्यायाने जे आनंदी असतात ते जगाला आनंद देतात, तुम्ही आनंदी असाल तर आनंद द्याल, क्रोधी असाल तर भांडणं कराल,दु:खी असाल तर दु:ख द्याल. छोटछोट्या गोष्टीत आनंद शोधला पाहिजे असे प्रतिपादन डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मानसशास्त्र विभाग प्रमुख डॉ अपर्णा अष्टपुत्रे यांनी “आनंदशास्त्र, सकारात्मक मानसिकतेचा प्रवास ” या विषयावर बोलताना केले.
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, माध्यमिक विभाग, जिल्हा परिषद, अंकुशराव टोपे महाविद्यालय, विप्र फाउंडेशन व १०० शिक्षक क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय मानसिक आरोग्य चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते त्याचे उद्घाटन डॉ अपर्णा अष्टपुत्रे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ दादासाहेब गजहंस हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ विक्रम सारूक, डॉ संजय पाटील उपस्थित होते.
पुढे बोलताना डॉ अष्टपुत्रे म्हणाल्या की आनंद हा चाॅईस आहे तो तुमच्या हातात आहे.आपल्यावर कोणत्या विचारांचा प्रभाव आहे हे ओळखता आले पाहिजे. ताणतणावातून बाहेर पडण्यासाठी ८ तासांची झोप घेतली पाहिजे, स्वतःचा शोध घेतला पाहिजे व कृतज्ञता बाळगली पाहिजे.
मानसशास्त्रज्ञ डॉ संदीप शिसोदे यांनी “एकाकीपण: नव्या युगाचे मानसिक संकट” या विषयावर व्याख्यान केले. यामध्ये बोलताना ते म्हणाले की मुलांशी पालकांचे भावनिक संभाषण कमी झाले आहे, मुलांना मनमोकळेपणाने बोलण्यासाठी कुटुंबात कुणीतरी असायला हवे. मुलांचा स्क्रीन टाईम चार तासांपेक्षा जास्त असेल तर ते मानसिक रुग्ण होऊ शकतात.
द्वितीय सत्रात मनोविकार तज्ज्ञ डॉ प्रकाश आंबेकर, डॉ चिन्मय बाऱ्हाळे, मानसशास्त्रज्ञ डॉ वर्षा मुळे यांच्या सोबत शिक्षकांनी प्रश्नोत्तराद्वारे संवाद साधला व मुलांच्या भावनिक व मानसिक आरोग्यावर चर्चा केली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष विप्र फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्रीनिवास गौड हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून पवन जोशी व १०० शिक्षक क्लबचे अध्यक्ष राजेभाऊ मगर हे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मानसशास्त्र विभाग प्रमुख डॉ सुजाता देवरे यांनी केले तर कार्यक्रमाची भूमिका जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे वरिष्ठ अधिव्याख्याता डॉ प्रमोद कुमावत यांनी मांडली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती मनिषा पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ शंकर तिकांडे यांनी मानले. कार्यक्रमाला वरिष्ठ अधिव्याख्याता डॉ वैशाली जहागीरदार, प्रेरणा मोरे, राजाराम टकले, योगेश्वर जाधव, सय्यद अख्तर, डॉ श्रीहरी दराडे, मानसशास्त्र विभागाचे डॉ अविन अकोलकर, डॉ श्रीपत गायकवाड, डॉ विलास वरखडे, डॉ निलेश कुंभकर्ण, डॉ प्रियंका सेठीया, प्राचार्य डॉ अनंत चौधरी, शंकर शेरे यांच्यासह बळ जिल्ह्यातील शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिक्षकांना सहभागाबद्दल प्रमाणपत्र देण्यात आले.



