विद्यार्थी हेच जीवनाचे शिल्पकार – उपशिक्षणाधिकारी श्री. पुजारी

टेंभुर्णी/दत्ता देशमुख,दि.18
१०० शिक्षक क्लब ऑफ जालना तर्फे जयंती महापुरुषांची वाचून साजरी करा या उपक्रमांतर्गत महात्मा जोतीराव फुले यांचे गुलामगिरी व शेतकऱ्यांचा आसूड तर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे माझी आत्मकथा हे पुस्तक समाजातील वाचन इच्छुक नागरिक, शाळा व विद्यार्थ्यांना विविध माध्यमातून वाटप केले जात आहे. ज्यातून महापुरुषांचे जीवन चरित्र घराघरात पोहोचवून महापुरुषांची जयंती नाचून नव्हे तर वाचून साजरी करा हा संदेश देण्यासाठी दि. ११ व १४ एप्रिल रोजी सामान्य ज्ञान परीक्षेचा पहिला टप्पा पार पडला त्यातील विजेत्या विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व महापुरुषांचे पुस्तक भेट उपशिक्षणाधिकारी (प्राथमिक) गिरीश पुजारी, डायटचे जेष्ठ अधिव्याख्याता डॉ. प्रकाश मांटे, प्रा. राजकुमार बुलबुले, प्रा. दत्तात्रय देशमुख , मुअ डॉ. शिवनंदा मेहेत्रे सुभाष पारे व जिल्हा समन्वयक अर्जुन पवार यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यावेळी हार फुलं देऊन स्वागत करण्याऐवजी पाहुण्यांचे स्वागत पुस्तक भेट देऊन करण्यात आले.याप्रसंगी उपशिक्षणाधिकारी गिरीश पुजारी यांनी विद्यार्थी हेच आपल्या जीवनाचे शिल्पकार आहेत. अशा ज्ञानवर्धक उपक्रमातून व महापुरुषांच्या विचारातून माणुस म्हणून समाजात व पेशात कसे आचारणे असावे हे कळेल तर डॉ. मांटे यांनी पुस्तक घडविते मस्तक,वाचाल तर वाचाल असे संबोधित करून महामानवाच्या कार्याचा आढावा घेतला तसेच जयंती महापुरुषांची संकल्प पुस्तक वाटपाचा हा एकमेव उपक्रम असल्याचे सांगितले. प्रा. बुलबुले यांनी हा स्तुत्य उपक्रम असुन समाजात वावरत असताना जात धर्म लिंग महत्वाचे नसून शिक्षणामुळे धारण केलेले पद महत्वाचे आहे त्यासाठी शिक्षकांचा आदर करा शाळेत घेतलेल्या ज्ञानाचे सार्थक होईल असे सांगितले. या उपक्रमात जालना शहरातील शांतिनिकेतन विद्यामंदिर,जीवनराव पारे विद्यालय, कै. बाबुराव जाफ्राबादकर विद्यालय व प्रयाग प्राथमिक विद्यालयाने सहभाग घेतला होता. पुस्तक वाटपाची भुमिका विशद करतांना समुहाचे अध्यक्ष राजेभाऊ मगर यांनी सांगितले की, आज प्रातिनिधिक स्वरूपात ५० विद्यार्थ्यांना पुस्तके वाटप करून ह्या विद्यार्थ्यांनी इतर पाच जणांना कडून पुस्तक वाचून घ्यावे व वाचनाचा अभिप्राय नोंदवावा त्यातून काही सर्वोत्कृष्ट वाचकांना पुस्तक भेट देऊन गौरव केला जाईल. परत ह्यातील विजेत्यांना इतरांकडून पुस्तक वाचून घ्यावे व ही वाचन साखळी पुढे पुढे वाढवत जावी अशा प्रकारे वर्षभरात महात्मा फुले यांचे द्विशतकोत्तर जयंती वर्ष साजरे केले जाणार अशी माहिती दिली. तसेच यावेळी समुहाचे सक्रियपणे कार्य करत असल्याबद्दल अशोक माधवले, साजिद खान पठाण, राजेश शेवाळे व संदीप इंगोले यांचा विशेष गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अप्पासाहेब मुळे यांनी तर आभार साजिद खान पठाण यांनी मानले.



