पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते जालना पोलीस दलासाठी वाहनांचे लोकार्पण
29 बोलेरो व 15 मोटारसायकल पोलीस दलाकडे सुपूर्द

जालना/प्रतिनिधी,दि.26
जिल्हा नियोजन समिती व पोलीस महासंचालक, मुंबई यांच्या कार्यालयाच्यावतीने देण्यात आलेल्या 29 बोलेरो आणि 15 मोटारसायकल वाहनांचे पोलीस आधुनिकीकरण कार्यक्रमातंर्गत जालना पोलीस दलासाठी राज्याचे गृहनिर्माण, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री तथा जालना जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते आज हिरवी झेंडी दाखवून लोकार्पण करण्यात आले.
जालना येथील पोलीस मुख्यालय मैदानावर भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमानंतर वाहनांच्या लोकार्पणाचा सोहळा संपन्न झाला. याप्रसंगी आमदार नारायण कुचे, आमदार राजेश राठोड, जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना, जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे हे उपस्थित होते.
जालना पोलीस दलाला यापूर्वी जिल्हा नियोजन समिती व पोलीस महासंचालक, मुंबई यांच्या कार्यालयाच्यावतीने 14 बोलेरो आणि 20 मोटारसायकल देण्यात आल्या होत्या. एकूण 78 वाहने चालू वर्षात जालना पोलीस दलाला देण्यात आली आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात पोलीस दलाला वाहन मिळण्याची ही पहिलीच घटना आहे.