मध्यप्रदेशातून जालन्याकडे येणारा गुटखा पारध पोलिसांनी पकडला चार लाखाचा गुटखा,15 लाखाच्या महागडया कारसह 19 लाखाचा मुद्देमाल जप्त पोलिसांना हुलकावणी देत मार्ग बदलणाऱ्या गुटखामाफियांच्या सिनेस्टाईल मुसक्या आवळल्या

विरेगाव/गणेश शिंदे,दि.30
मध्यप्रदेश राज्यातून बंदी असलेला गुटखा फोर्ड कंपनीच्या इको स्पोर्ट या कारमधून (क्र.एमएच-01, बीके-1432) जळगाव, फतेपुर, धावडा मार्गे भोकरदनकडे येणार असल्याची माहिती सोमवारी (ता. 29) रात्री पारध पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक चैनसिंग गुसिंगे यांना मिळाली होती.
या माहितीच्या आधारे सपोनि. गुसिंगे यांनी पथकासह धावडा गावाजवळ सापळा रचला होता.
पोलिसांना पाहून हे गुटख्याचे वाहन न थांबविता समतानगरच्या दिशेने नेले होते.
समतानगर येथील शिवाजी महाराज चौकात आधीच पोलिसांनी काही नागरिकांना रस्त्यात वाहने आडवी लावून, गुटख्याचे वाहन अडविण्यासाठी सतर्क केले होते.
मात्र, रस्त्यावर आडव्या लावलेल्या वाहनांना चिरडून आणि ग्रामस्थांना धडक मारून गुटख्याचे हे वाहन सिल्लोड तालुक्यातील शिवना गावाच्या दिशेने वेगाने निघाले होते.
सपोनि.गुसिंगे यांनी पोलिसांच्या गाडीसोबत एक खाजगी वाहन घेऊन गुटख्याच्या वाहनाचा पाठलाग सुरूच ठेवला.
त्यांनतर हे गुटख्याचे वाहन शिवनाकडून आनवा रोडने भरधाव वेगाने निघाले होते.
आडगाव भोंबे या गावाजवळ रस्त्यात आडवे वाहन लावून हे गुटखा वाहन मोठ्या शिताफीने पकडण्यात आले
या वाहनांमध्ये तब्बल 3 लाख 92 हजार रुपयांचा गुटखा आढळून आला असून, 15 लाख रुपयांची कार आहे, असा एकूण 19 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या गुटखा वाहनांच्या धावडा येथील सतिश शेनफड मोकसरे हा तरुण जखमी झाला आहे.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, भोकरदनचे उपविभागीय अधिकारी गणपत दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पारध पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक चैनसिंग गुसिंगे, पोलीस अंमलदार शिवाजी जाधव, जिवन भालके, नितेश खरात यांनी केली.
याप्रकरणी भोकरदन येथील शेख अमेर शेख बाबा आणि शेख अमेर शेख सिराज या दोघांना ताब्यात घेवून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.