नेरपिंगळाईच्या श्री गणेश विसर्जन मिरवणुकीत नागरिकांची अलोट गर्दी,
१७ तासांपेक्षा अधिक वेळ चालली मिरवणूक

मोर्शी ता/प्रतिनिधि,दि.7
एक हजार पेक्षा अधिक वर्षांची ऐतिहासिक परंपरा असणाऱ्या मोर्शी तालुक्यातील नेरपिंगळाई येथील वीरशैव लिंगायत समाजाच्या श्री गुरु गंगाधर स्वामी मठातील श्री गणेशाचे प्रचंड जनसमुदायाच्या उपस्थितीत अनंत चतुर्दशीला आजार(दि. 7) विसर्जन करण्यात आले. भाविकांची अलोट गर्दी, पालखी, दिंड्या, ढोल ताशांच्या निनादात श्री गणेशास निरोप देण्यात आला. नेरपिंगळाई येथील वीरशैव लिंगायत समाजाच्या श्री गुरु गंगाधर स्वामी मठातील सार्वजनिक श्री गणेश उत्सवाची परंपरा १०५३ वर्षांपासून हा उत्सव परंपरागतपणे सुरू आहे. या वर्षी गावात भाविकांनी अत्यंत उत्साहाने उत्सव साजरा केला. सोमवारी (दि. १६) रात्री बारा वाजता मठातून श्री गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली. सर्वप्रथम मठातील तीर्थ शेजारीच असणाऱ्या श्री गणेश थिएटर येथे आणण्यात आले. त्यानंतर श्री गणेश मिरवणुकीला सुरुवात झाली. सर्वात पुढे दिंड्या, त्यानंतर मठातील श्री गणेशाची मिरवणूक, त्यामागे संत गुलाब पुरी महाराज मंदिरातील श्री गणेशाची मिरवणूक होती. यानंतर गावातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी श्री गणेशासह मिरवणुकीत सहभागी झाले होते. शनिवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत मिरवणूक सुरू होती. भाविकांच्या अलोट गर्दीने श्री गणेशाचे दर्शन घेतले. मठाधिपती शिवशंकर महाराज यांच्यासह भाविकांनी श्री गणेशाची आरती करून विसर्जन केले. दरम्यान, विसर्जन मिरवणुकीत नेरपिंगळाईसह अमरावती व इतर जिल्ह्यातील भाविक सहभागी झाले होते. रस्त्याच्या दुतर्फा भाविकांनी मोठी गर्दी केली होती.श्री गणेश विसर्जन मिरवणुकीला काल रात्री बारा वाजता सुरुवात झाली. त्यानंतर सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास ही मिरवणूक गावातील नदीवर पोहाचली. १७ तासांपेक्षा अधिक वेळ ही मिरवणूक सुरू होती. प्रथम श्री गुरु गंगाधर स्वामी मठातील श्री गणेशाचे विसर्जन करण्यात आले. त्यानंतर गावातील इतर मंडळांचे पदाधिकारी व सदस्यांनी त्यांच्या श्री गणेशमूर्तींचे नदीत विसर्जन केले. मिरवणुकीदरम्यान शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी शिरखेड पोलिस स्टेशनचे ठाणेदार सचिन लुले यांच्या मार्गदर्शनात पोलिस प्रशासन सज्ज होते.विसर्जनादरम्यान गावातील विग्ज फाऊंडेशन व विदर्भ गणेशमंडळ यांच्या वतीने निर्माल्य संकलन करण्यात आले. गावातील नदी स्वच्छ राहावी यासाठी काही वर्षांपासून सदर संस्था कार्य करीत आहे.
श्री गणेश विसर्जन मिरवणुकीत मोठ्या संख्येने दिंड्या सहभागी झाल्या होत्या. टाळ मृदुंग यासह दिंड्यांच्या तालावर नाचणारे महिला वेशातील पुरुष यांना पाहण्यासाठी देखील नागरिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. शनिवारी रात्रीपासून सुरू झालेली ही मिरवणूक व जल्लोष रविवार सायंकाळपर्यंत कायम होता.या गणेश विसर्जन मिरवणूक गावातील मस्जिद चौक परिसरात पोहचल्यानंतर तिथे मुस्लिम बांधवांनी गणरायाच्या मुर्तीचे पूजन केले. पोलिस अधिकाऱ्यांना देखील शाल देऊन सन्मानित करण्यात आले. मिरवणुकीत सद्भाव दिसून आला.



