घाणेवाडी व जायकवाडी पाणीपुरवठा योजनेच्या कामाचा शुभारंभ
जालना शहराच्या सर्वांगिण विकासासाठी सदैव कटीबध्द - केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे

जालना/प्रतिनिधी,दि.14
जालना शहराला पाणी पुरवठ्यासाठी उच्च क्षमतेचा जल शुध्दीकरण प्रकल्प आवश्यक होता. तरी महाराष्ट्र सुवर्ण जयंती, नगरोत्थान महाअभियान (राज्यस्तर) अंतर्गत मंजूर जालना शहरातील घाणेवाडी व जायकवाडी पाणीपुरवठा योजनाचा 72 कोटी रुपयांचा सुधारणात्मक कामांचा शुभारंभ आज झाला असून शुध्द पाणी मिळण्याची वाट मोकळी झाली आहे. असे प्रतिपादन रेल्वे, कोळसा व खाण राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिली.
महाराष्ट्र सुवर्ण जयंती, नगरोत्थान महाअभियान (राज्यस्तर) अंतर्गत मंजूर जालना शहरातील घाणेवाडी व जायकवाडी पाणीपुरवठा योजनेचा 72 कोटी रुपयांचा सुधारणात्मक कामांचा शुभारंभ कार्यक्रम आज जालना येथील मामा चौकात पार पडला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी आमदार कैलास गोरंट्याल, आमदार नारायण कुचे, जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, भास्कर अंबेकर, बद्री पठाडे, भास्करआबा दानवे यांची प्रमुख उपस्थिती होती.
श्री.दानवे म्हणाले की, जालना शहर हा मराठवाड्यातील मध्यवर्ती जिल्हा आहे, त्यामुळे येथून दळणवळणाची साधने वाढावी या उद्देशाने मागील काही वर्षात समृध्दी महामार्गासह इतर राष्ट्रीय महामार्गाचे काम करण्यात आले. नुकतीच जालना-खामगाव या रेल्वे मार्गाला मंजूरी देण्यात आली आहे. ड्रायपोर्ट, आयसीटी कॉलेज, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जालना शहर अंतर्गत पाणीपुरवठा जलवाहिनीसाठी निधी, पीटलाईनसाठी 100 कोटी रुपये, तर जालना ते जळगाव रेल्वे मार्गाला मंजूरी देण्यात आलेली आहे. यातुन जालना शहराचा कायापालट करण्याचा सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
प्रास्ताविक भास्करआबा दानवे यांनी केले. यावेळी आमदार कैलास गोरंट्याल, भास्कर अंबेकर यांची समयोचित भाषणे झाली. कार्यक्रमास पदाधिकारी, नागरिक, संबंधित यंत्रणेचे अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.