तिवसा येथे भागवत कथेला भाविकांचा प्रतिसाद:9 फेब्रुवारीला होणार समारोप,

मोर्शी/त्रिफुल ढेवले,दि.8
तिवसा : शहरातील आनंदराव पाटील माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात २ फेब्रुवारीपासून श्री समर्थ रतनगीर महाराज पुण्यतिथी महोत्सव, संत गाडगे महाराज पुण्यतिथी व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी महोत्सवाला प्रारंभ झाला आहे. त्यानिमित्त श्रीमद् भागवत कथा व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले आहे. महोत्सवाची सांगता रविवारी (दि. ९) होणार आहे. या सप्ताहात भागवताचार्य किशोरी सांगोले या कथा प्रवक्ता असून, दररोज होणाऱ्या भागवत कथेचा लाभ घेण्यासाठी पंचक्रोशीतील भाविक उपस्थिती लावत आहेत. २ फेब्रुवारीला पहाटे ५ वाजता श्रींचा अभिषेक व तीर्थस्थापना करून या महोत्सवाला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर पहाटे साडेपाच वाजता ग्राम स्वच्छता व जनजागृती, सकाळी सव्वासहा वाजता ध्यान व काकड आरती, ९ वाजता किशोरी सांगोले यांचे श्रीमद् भागवत प्रवचन झाले. सप्ताहादरम्यान शनिवारी दि. ८ दुपारी २ ते सायंकाळी ६ या वेळात श्रीमद् भागवत प्रवचन होऊन परिसरातून शोभायात्रा काढण्यात येईल. रविवारी दि. ९ पहाटे ५ वाजता होम हवन, त्यानंतर सामुदायिक ध्यान व चिंतन होईल. तत्पश्चात सकाळी ९ वाजता चंद्रकांत जाजोदिया, आ. राजेश वानखडे, आ. रवी राणा यांचा याप्रसंगी सत्कार करण्यात येईल. दुपारी १ ते ४ वाजेपर्यंत काला व महाप्रसादाने या सप्ताहाचा समारोप करण्यात येणार आहे. सप्ताहातील भागवत कथेचा तसेच अन्य कार्यक्रमाचा भाविकांनी लाभ घेण्याचे आवाहन रतनगीर महाराज नगरवासी व शहरवासीयांनी केले आहे.
यांची लाभतेय साथसंगत : या भागवत सप्ताहात ज्ञानेश्वर महाराज घोटकर वऱ्हा संतोष महाराज मुळे आर्वीविश्वेश्वर महाराज माहोरे माळेगाव हे साथसंगत करत आहेत, तर सप्ताहातील भजन मंडळात बबनराव अटाळकर, दिनकरराव राऊत, श्रीकृष्ण लवणकर, प्रदीप आकोटकर महाराज व संच अखंड हरिनाम सप्ताह तसेच लक्ष्मण महाराज चौधरी व विणेकरी संचाचे सहकार्य लाभत आहे. दैनंदिन कार्यक्रम असे सप्ताहात दैनंदिन कार्यक्रमांना पहाटे ५ वाजता ध्यान व काकड आरतीने प्रारंभ होत आहे. त्यानंतर सकाळी ९ व दुपारी ३ वाजता किशोरी सांगोले यांचे श्रीमद् भागवत प्रवचन, सायंकाळी साडेपाच वाजता सामुदायिक प्रार्थना व हरिपाठ, रात्री ८ वाजता हरिकीर्तनाचा कार्यक्रम होत असून, हजारो भाविक या कार्यक्रमांचा लाभ घेत आहेत.