जिल्ह्याबाहेर चारा वाहतुकीस प्रतिबंध; जिल्हाधिकारी यांचे आदेश जारी

जालना/प्रतिनिधी,दि.8
राज्यातील दुष्काळ घोषित केलेल्या 40 तालुक्यांव्यतिरीक्त इतर तालुक्यामधील महसुल मंडळामध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती घोषित करण्यात आलेली आहे. त्यामुळे जालना जिल्ह्यामधील सर्व तालुक्यामध्ये दुष्काळ व दुष्काळ सदृश्य परिस्थिती घोषित करण्यात आलेला आहे. जालना जिल्हयात चालु वर्षी सरासरी पेक्षा कमी व अनियमित पर्जन्यमान झाल्याने चाऱ्याची टंचाई निर्माण होवू शकते. त्यामुळे जिल्ह्यात उत्पादीत झालेला खरीप व रब्बी हंगामातील चारा जिल्ह्यामध्ये पशुधनास वापरण्यासाठी जिल्ह्याबाहेर वाहतुकीस प्रतिबंध करण्यात आला आहे, असे आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी जारी केले आहेत.
जिल्ह्यात एकुण लहान व मोठे 5 लाख 3 हजार 72 पशुधन आहे. त्याच बरोबर शेळ्या व मेंढ्याची संख्या 3 लाख 24 हजार 313 आहे. त्यामुळे जिल्ह्यात सदर पशुधनासाठी प्रतिदिन व प्रतिमाह चाऱ्याची मागणी मोठ्या प्रमाणात आहे. जिल्ह्याअंतर्गत उपलब्ध पशुधनासाठी चाऱ्याच्या मागणीचा विचार करता जिल्ह्यात उत्पादित झालेला चारा भविष्यात पशुधनासाठी अपुरा पडणार असल्यामुळे जिल्ह्याबाहेर वाहतुकीस प्रतिबंध करणे आवश्यक आहे. त्याअर्थी जिल्ह्यामध्ये खरीप व रब्बी पिकापासूनचा उत्पादीत चारा, मुरघास आणि टोटल मिक्स रेशन याची इतर जिल्ह्यात वाहतुक करण्यास बंदी आणल्यास भविष्यात चारा टंचाईची समस्यावर नियंत्रण राहणार आहे. तसेच जिल्ह्याबाहेरील निविदा धारकांना निविदा लिलाव देण्यात येवू नये, त्यामुळे जिल्ह्यात चारा टंचाई भासणार नाही व कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही. या अनुषंगाने जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता, 1973 चे कलम 144 नूसार जालना जिल्ह्यात उत्पादीत होणारा चारा, मुरघास आणि टोटल मिक्स रेशन, (टीएमआर) याची इतर जिल्ह्यात किंवा लगतच्या राज्यात जिल्ह्यातील दुष्काळ व दुष्काळ सदृश्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर वाहतुक करण्यास मनाई केली आहे. हा आदेश निर्गमित करण्यात आल्यापासून पुढील 4 महिने कालावधीसाठी लागु राहील. असेही आदेशात नमुद करण्यात आले आहे.