pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

जालना येथील राष्ट्रीय हिंदी विद्यालयात कायदेविषयक शिबीर संपन्न

0 1 1 8 3 4

जालना/प्रतिनिधी,दि.28

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जालना व इनरव्हिल क्लब ऑफ जालना यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय हिंदी विद्यालय जालना येथे कायदेविषयक शिबीर दि.28 जुलै 2023 रोजी घेण्यात आले. या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणुन राष्ट्रीय हिंदी विद्यालय प्राचार्य रिता टंडन, तसेच प्रमुख मार्गदर्शक म्हणून जिल्हा व सत्र न्यायाधीश वर्षा मोहिते, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव पी.पी. भारसाकडे-वाघ, सह दिवाणी न्यायाधीश श्रीमती एन. ए. वानखेडे, अतिरिक्त न्यायाधीश लिशा पटेल, संस्थाध्यक्ष सतिष बगडिया, सदस्य किशोर बगडिया, संचालक अजय अग्रवाल, इनरव्हिल क्लब अध्यक्षा शिखा गोयल व ॲड. अश्विनी धन्नावत उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरूवातीस विद्यार्थ्यांनी लैंगिक गुन्ह्यांपासुन बालकांचे संरक्षण, कायदा २०१२ (पोक्सो) यावर एक सुंदर पथनाटय मान्यवरांसमोर सादर केले. सदर पथनाट्य हे श्रीमती दुर्गा घोडके यांनी दिग्दर्शीत केले कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणुन न्यायाधीश वर्षा मोहिते यांनी लैंगीक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण, कायदा 2012 या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. उपस्थित विद्यार्थी- विद्यार्थीनींना गुड टच बॅड टच याबद्दल सांगितले व मुलांचा त्यांच्या जवळच्या लोकांकडून किंवा ओळखीच्या लोकांकडून लैंगिक छळ होण्याची शक्यता अधिक असते. सहसा मुलं त्याबद्दल बोलत नाहीत त्यामुळे पालकांनी आणि शिक्षकांनी मुलांना बोलतं केलं पाहिजे. मुलांवर होणा-या लैंगिक अत्याचारा बाबत जे मार्गदर्शन केले जात आहे त्याबाबत मुलांनी इतरांना सुध्दा माहिती दयावी. विशेष म्हणजे सदर कार्यशाळा ही पालक व शिक्षकांसमक्ष घेतली जात आहे याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. जी गोष्ट आपल्याला खटकते व आपल्या सोबत काहीतरी चुकीचे वर्तन कुणीतरी करत आहे असे वाटल्यास त्याबद्दल त्वरित आपल्या आई-वडीलांकडे, शिक्षकांकडे मुलं तकार करू शकतात असे त्यांनी सांगितले. प्रत्यक्ष शाळेनी मुलांना मनमोकळेपणाने तकार करण्यासाठी यंत्रणा कार्यान्वित करावी असे आवाहन केले. मुलांना न्यायालयीन प्रकीये बाबत माहिती देतांना ही बाब सुध्दा सांगितली की, बाल लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात पुर्णतः गोपनीयता बाळगली जाते. वर्तमानपत्रात सुध्दा पीडित मुलीचे नाव व ओळख समजेल असा मजकूर दिला जात नाही. म्हणून मुलांनी अशा प्रकरणात पुढे येवून तकार करावी असे त्यांनी सांगितले. शेवटी मुख्याध्यापिका टंडन यांना शाळेमध्ये लैंगिक गुन्ह्यापासून बालकांचे संरक्षण यासाठी एक कमिटी स्थापन करावी अशी सुचना केली, नंतर उपस्थित विद्यार्थीनींनी प्रश्न विचारून आपल्या शंकांचे निरसन करून घेतले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीमती भारसाकडे-वाघ, यांनी केले. त्यांनी आपल्या प्रास्ताविकेमध्ये जिल्हा विधी सेवा प्राधिकरण मार्फत काय काय कामे चालतात तसेच विविध योजना याबद्दल माहिती दिली. तसेच सह दिवाणी न्यायाधीश श्रीमती वानखडे यांनी बाल न्याय (मुलांची काळजी आणि संरक्षण), कायदा २०१५ या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. श्रीमती शिखा जी. गोयल, अध्यक्ष, इनरव्हिल क्लब, जालना यांनी ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ या शासनाच्या उपक्रमाबद्दल माहिती दिली. तसेच अँड अश्विनी धन्नावत यांनी बालकांचे हक्क याविषयावर मार्गदर्शन केले. असे प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 1 8 3 4