तहसील कार्यालयाकडून गावनिहाय याद्या जाहीर; अतिवृष्टीच्या अनुदानासाठी ई-केवायसी करावी
जालना/प्रतिनिधी,दि.7
अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीपोटी देण्यात येणाऱ्या अनुदान वाटपामध्ये काही शेतकऱ्यांच्या खात्यावर आधार बँक खाते लिंक नसणे, आधार इनॲक्टीव्ह असणे या कारणामुळे पेमेंट नाकारलेल्या लाभार्थ्यांची यादी संबंधित तहसील कार्यालयाकडून गावनिहाय प्रसिध्द करण्यात आली आहे. तरी अतिवृष्टीने पिकांचे नुकसान झालेल्या सर्व पात्र लाभार्थी अर्जदारांनी आधार प्रमाणिकरण करण्याकरीता आपले व्हीके नंबर घेवून आपले सरकार केंद्रावर ई-केवायसी करावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके यांनी केले आहे.
अर्जदाराने सर्वप्रथम आपले आधारकार्ड आपल्या बँक खात्यासोबत लिंक करुन घ्यावे. जर आधार इनॲक्टीव्ह असेल तर आधार केंद्रामध्ये जाऊन ते ॲक्टिव्ह करून घ्यावे तसेच जर बँक खाते आधारला लिंक असेल तर आपल्या बँकेत जाऊन तपासणी करून घ्यावे आणि आपले बँक खाते ॲक्टिव्ह करावे. याप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी. ही कार्यवाही पुर्ण केल्यावर तसेच काही अडचण असल्यास तहसील कार्यालयातील नैसर्गिक आपत्ती विभागाशी संपर्क साधावा. असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.