बालविवाह मुक्त ग्रामपंचायत संकल्पना अधिक प्रभावीपणे राबवा – जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ

जालना/प्रतिनिधी,दि.21
बाल विवाह झाल्यामुळे शिक्षण घेत खेळायच्या वयात मुलींवर कुटुंबाची जबाबदारी लादली गेल्याने मुलींच्या शारिरीक व बौध्दीक वाढीत कमतरता निर्माण होत असते. तरी जालना जिल्हा बालविवाहमुक्त होण्यासाठी सर्व विभागांनी समन्वय साधत ग्रामपंचायतीमधील सक्रीय लोकांच्या संपर्कात राहत बालविवाहमुक्त ग्रामपंचायत ही संकल्पना अधिक प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिले.
जिल्हा बाल संरक्षण विषयावर जिल्हाधिकारी कार्यालयात त्रैमासिक आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी डॉ. पांचाळ बोलत होते. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी कोमल कोरे, जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी नवनाथ वामन, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी गजानन इंगळे, बाल कल्याण समिती अध्यक्ष एकनाथ राऊत आदींची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी डॉ. पांचाळ म्हणाले, जालना जिल्ह्यात मागील तीन महिन्यात 42 बालविवाह रोखण्यात बालकल्याण समितीला यश आले असले तरी जिल्ह्यात एकही बालविवाह होऊ नये यासाठी समाजातील प्रत्येकाने सर्वंकष प्रयत्न करण्याची गरज आहे. ग्रामीण भागामध्ये बालविवाह रोखण्यासाठी जनमानसांमध्ये जाणीवजागृती करण्याबरोबरच कायद्याचा वचकही बसणे गरजेचे असुन जिल्ह्यात बालविवाह होत असल्यास संबंधितांवर कायद्यानुसार कारवाई करण्यात यावी. जिल्ह्यात बालविवाहमुक्त ही संकल्पना अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी सरपंच, ग्रामसेवक, आशाताई यांच्या सर्व संबंधितांसाठी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात यावे. शाळेत सतत अनुपस्थित असणाऱ्या मुलींची माहितीही ठेवण्याच्या सुचना जिल्हाधिकारी डॉ. पांचाळ यांनी यावेळी केल्या.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. पांचाळ यांनी जिल्हा बाल संरक्षण समितीचे कामकाज, चाईल्डलाईन, जनजागृतीपर व्हिडिओ, राष्ट्रीय किशोर स्वास्थ कार्यक्रम, सक्षम बालविवाह निर्मुलन प्रकल्प, संवाद पेटी उपक्रम, किशोरी मेळावे, थ्रो बॉल खेळ, बालकल्याण समिती, बालगृह व बाल निरीक्ष्ण गृह, केंद्र पुरस्कृत सखी वन स्टॉप सेंटर, जिल्हा परिविक्षा समिती आदी विषयांवरही विस्तृत आढावा घेतला. या बैठकीस संबंधित यंत्रणेचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.