चिरनेर येथील नरेश नारंगीकर यांचा मरणोत्तर अवयव दान करण्याचा निश्चय

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.12
अवयव दान हेच सर्व श्रेष्ठदान असून,मरणोत्तर अवयव दान करणाऱ्या उरण तालुक्यातील चिरनेर गावचे भूमिपुत्र नरेश तुकाराम नारंगीकर यांनी आपल्या ५१ व्या वाढदिवसानिमित्त कोणत्याही प्रकारचा गाजावाजा न करता, मृत्यूनंतर आपल्या शरीरातील अवयवांचा उपयोग दुसऱ्यांचे जीवन खुलवण्यासाठी व्हावा,दुसऱ्यांच्या जीवनाला जीवदान मिळावे,म्हणून मृत्युंनंतर स्वतःच्या शरीरातील अवयव दान करण्याचा संकल्प त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने केला असून, त्यांनी शासकीय रुग्णालयात जाऊन मृत्युंनंतरच्या अवयव दानासाठीच्या फार्मॅलिटीचा अधिकृत रित्या फॉर्म भरून दिला आहे.
व्यवसायाने घर बांधणी मिस्त्री काम करीत असलेल्या मरावे परी कीर्तिरूपे उरावे अशा नरेश नारंगीकर यांनी आपल्या मृत्यूनंतर स्वर्गवासी झाल्यावर गरीब – गरजू अंधत्वाचे जीवन प्रकाशमय होण्यासाठी
किंवा एखाद्या अपघातग्रस्त रुग्णाला आपल्या अवयवांचा उपयोग व्हावा यासाठी स्वईच्छेने अवयव दान करण्याचा निश्चय केला आहे.शरीर हे नश्वर आहे पण आत्मा अमर आहे. असे म्हटले जाते.पण आजच्या युगात विज्ञानाने इतकी प्रगती केली आहे. की, हे नश्वर शरीर हे दुसऱ्या एखाद्या व्यक्तीच्या जीवनात आनंद निर्माण करू शकतो.
नरेश नारंगीकर यांच्या वाढदिवसदिनी केलेला अवयव दानाचा संकल्प म्हणजे या परिवारासाठी अभिमानास्पद असा दिवस, मृत्यूनंतर हे नश्वर शरीराचे राखेत रूपांतर होण्याआधी या शरीराचा एखादा अवयव दुसऱ्या एका व्यक्तीच्या कुटुंबाच्या जीवनात आनंद निर्माण करणारा होईल .याचा या परिवाराला निश्चित अभिमान असावा. शंभर वर्ष रस्त्यातील दगड होऊन जगण्यापेक्षा जाई – जुईच्या झाडावरच फुल होऊन दोन दिवस जगाव समाजाला सुगंधातून आनंद द्यावा.अशी अपेक्षा व्यक्त करून अवयव दान करण्याचा निश्चय करणारे नरेश नारंगीकर यांचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.