सालबर्डी येथील यात्रेत हरवलेली बालिका पालकांच्या स्वाधीन; मोर्शी येथील पोलिसांची ऑपरेशन मुस्कान अंतर्गत कामगिरी,

मोर्शी/त्रिफुल ढेवले,दि.7
मोर्शी : सालबर्डी येथील महाशिवरात्रीनिमित्त भरलेल्या यात्रेमध्ये चुकून पालकांचा हात सुटल्याने पाच वर्षीय बालिका हरवली होती. दरम्यान, मोर्शी पोलिसांनी ऑपरेशन मुस्कान अंतर्गत तिच्या पालकांचा शोध घेत तिला त्यांच्या स्वाधीन केले. मुलगी सुखरुप परत मिळाल्याने पालकांच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता. सालबर्डी येथे १ मार्च रोजी महाशिवरात्रीनिमित्त यात्रा भरली होती. तळणी येथील सुरेश उईके हे पत्नी मनीषा उईके आणि पाच वर्षीय मुलगी आरुषी हिच्यासोबत या यात्रेत आले होते. त्याच वेळी आरुषी हरवली. ती यात्रेत रडत असल्याचे एका महिलेच्या निदर्शनास येताच तिने तिला मोर्शी पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिस पथकाने चिमुकलीची विचारपुस केली असता, तिने ती तळणी येथे राहत असल्याचे सांगीतले.पोलिस पथकाने तळणी येथे चौकशी केली असता चिमुकलीने दिलेल्या माहितीत सत्यता असल्रूाचे आढळून आले. त्या वेळी गावातील काही नागरिकांच्या मदतीने सुरेश उईके यांना सालबर्डी येथील पोलिस चौकीत बोलावण्यात आले व आरुषीला त्यांच्या स्वाधीन करण्यात आले. ही कामगिरी ऑपरेशन मुस्कान अंतर्गत पोलिस निरीक्षक मोहदुळे यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक विजय लेव्हरकर, सपोउनि स्वप्निल ठाकरे, गोपनीय शाखेचे पोलिस हवलदारसंदीप वानखडे, विष्णू पवार व यात्रेत बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांच्या वतीने पार पाडण्यात आली.