pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

आम्हीच बनवलेल्या रस्त्यांवरून येऊन आम्हाला शिव्या घालू नका – उदय सामंत

खासदार बारणे तीन लाखांहून अधिक मताधिक्याने विजयी होतील - उदय सामंत

0 1 7 4 7 6

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.7

आम्हीच बनवलेल्या रस्त्यावरून येऊन आमच्यावरच टीका करू नका, असा टोला रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी शिवसेना ‘उबाठा’चे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना नाव न घेता लगावला. महाविकास आघाडीने केवळ टीकेसाठी टीका करू नये, विकासावर बोलावे, असेही सामंत यांनी सुनावले. मावळ लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे तीन लाखांहून अधिक मताधिक्याने विजयी होतील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी- आरपीआय- रासप मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारासाठी उरण विधानसभा मतदारसंघात जेएनपीटी वसाहतीतील बहुउद्देशीय सभागृहात महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक आयोजित केली होती. त्यावेळी ते बोलत होते.

व्यासपीठावर महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे, माजी खासदार रामशेठ ठाकूर, पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, उरणचे आमदार महेश बालदी, भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष भोईर, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष उमाताई मुंडे, रिपब्लिकन पार्टी आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड, दिवंगत ज्येष्ठ नेते दि. बा. पाटील यांचे पुत्र अतुल पाटील तसेच उरण तालुक्यातील महायुतीच्या घटक पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बारणे यांना ‘रेकॉर्ड ब्रेक’ मताधिक्य मिळेल

सामंत म्हणाले की, स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजितदादा पवार निवडणुकीला उभे आहेत, असे समजून मावळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी काम करावे. मावळमधील सहाही आमदार महायुतीचे आहेत. त्यामुळे खासदार बारणे हे मोठ्या मताधिक्याने विजयी होणाऱ्या ४०० खासदारांपैकी एक असले पाहिजेत. महायुतीच्या नेत्यांप्रमाणेच कार्यकर्त्यांनीही एकजुटीने काम करून रेकॉर्ड ब्रेक मताधिक्य मिळवलेच पाहिजे.

‘टीका करायचीच असेल तर पोहत या…’

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उरणमध्ये बोलताना महायुतीवर तोंडसुख घेतले होते. त्याला सामंत यांनी सडेतोड उत्तर दिले. चांगले झाले की फुकटचे श्रेय घ्यायची काही लोकांची प्रवृत्ती असते. निवडणुका आल्या की, त्यांना बाळासाहेब ठाकरे, दि. बा. पाटील यांची नावे आठवतात. निवडणूक गेल्या की त्यांचे ‘फेसबुक लाईव्ह’ सुरू होते. केंद्र व राज्य सरकारने उरण तालुक्यात मोठ्या प्रमाणात विकास कामे केली आहेत. केवळ भावनिक भाषणे देण्याऐवजी विरोधकांनी विकासावर बोलावे. उत्तम दर्जाचे रस्ते केल्यामुळे आता ५५ मिनिटांत उरणला येता येते. त्याच रस्त्यावरून यायचे आणि आमच्यावरच टीका करायची हे चालणार नाही. टीका करायचीच असेल तर तुम्ही बनवलेल्या रस्त्याने या, नाहीतर पाण्यातून पोहत या, अशी खरमरीत टीका सामंत यांनी केली.

महायुतीकडून दि. बा. पाटील यांचा सन्मान.

नवी मुंबई- पनवेल येथे होत असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाने घेतला व केंद्र शासनाकडे मंजुरीसाठी पाठवला. आता त्यावर केंद्र शासनाकडून कार्यवाही सुरू आहे. उद्धव ठाकरे यांना राजीनामा देण्याच्या दिवशी दि. बा. पाटील यांचे विमानतळाला देण्याची आठवण झाली होती, यातच सर्वकाही आले, असे सामंत म्हणाले.

‘खासदार बारणे ‘गुगली’वर मारतात सिक्सर’

वेंगसरकर अकॅडमीच्या माध्यमातून खासदार श्रीरंग बारणे यांनी उत्तम क्रिकेटपटू घडवल्याचे सांगितले, पण स्वतः खासदार बारणे हे राजकारणातील उत्तम क्रिकेटपटू आहेत. गुगली बॉल वर सिक्सर मारणे त्यांना उत्तम जमते, अशी टिप्पणीही त्यांनी केली.

रायगड जिल्ह्याचा पालकमंत्री असूनही मावळातील महाविकास आघाडीच्या उमेदवाराचे नाव काय आहे, हे मला आठवत नाही, या शब्दांत सामंत यांनी प्रतिस्पर्धी उमेदवाराची खिल्ली उडवली.

विकासाच्या मुद्द्यावर मागणार मते – बारणे

खासदार बारणे यांनी केंद्र शासनाच्या माध्यमातून उरण विधानसभा मतदारसंघात झालेल्या कामांची माहिती दिली. आठ पदरी रस्ता, पनवेल-उरण रेल्वे, देशातील सर्वात मोठे विमानतळ, प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी केलेले प्रयत्न, आदिवासी पाड्यांपर्यंत वीजपुरवठा, अटल समुद्र सेतू, मच्छीमारांच्या प्रश्नांचा पाठपुरावा, दत्तक ग्राम म्हणून उरणमधील बांधपाडा खोपटे गावाचा विकास केल्याचे बारणे यांनी सांगितले. केलेली विकास कामे व मतदारसंघातील संपर्क या जोरावर आपण विक्रमी मताधिक्याने विजयी होऊ, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

धनुष्यबाण चिन्ह घरोघर पोहोचवा – रामशेठ ठाकूर

महायुती म्हणून आपण गेली दहा वर्षे एकत्र काम करत आहोत. त्यामुळे महायुती एकजीव झाली आहे. मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी मावळ मतदारसंघातील घराघरापर्यंत धनुष्यबाण चिन्ह पोहोचवा. प्रत्येक बूथवर किमान ५१% ज्यादा मते मिळावीत, यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी, अशा सूचना रामशेठ ठाकूर यांनी केल्या.

महायुतीमुळे उरणचा कायापालट – महेश बालदी

केंद्रातील मोदी सरकार व राज्यातील महायुती सरकारने अनेक ‘गेम चेंजर’ प्रकल्प उरण तालुक्याला दिले असून त्यामुळे तालुक्याचा पूर्ण कायापालट झाला आहे, याकडे आमदार महेश बालदी यांनी लक्ष वेधले. उद्धव ठाकरे यांनी उरणमध्ये महाविकास आघाडीचा उमेदवार जाहीर केला. त्यावेळी त्यांनी २३ मिनिटांचे भाषण केले, मात्र त्यापैकी तीन मिनिटे देखील ते उरणविषयी बोलले नाहीत. मुख्यमंत्री असताना त्यांनी उरणसाठी काय केले, असा थेट सवाल बालदी यांनी केला. भावनिक भाषणांना मतदार भुलणार नाहीत, असेही त्यांनी ठाणकावून सांगितले.

प्रत्येक मत विकासाला – प्रशांत ठाकूर

खासदार बारणे हे जनतेची नस ओळखून काम करणारे खासदार आहेत. असा खासदार मिळणे हे आपले सुदैव आहे, असे गौरवोद्गार आमदार प्रशांत ठाकूर यांनी काढले. उरण विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक मत विकासालाच मिळेल, याची काळजी महायुतीच्या कार्यकर्त्यांनी घ्यावी, असे त्यांनी सांगितले.

‘दि. बां.’ ना मानणारे प्रत्येक मत बारणे यांनाच – अतुल पाटील

नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्वर्गीय दि. बा. पाटील यांचे नाव देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुती शासनाने एकमताने घेतला व केंद्र शासनाकडे पाठवला, ही वस्तुस्थिती आहे. तरीदेखील काही मंडळी विनाकारण खोटी माहिती पसरवून संभ्रम निर्माण करीत आहेत, असा आरोप अतुल पाटील यांनी केला. दि. बा. पाटील यांना मानणारे प्रत्येक मत खासदार बारणे यांनाच मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

मोदी हे संविधानाला मानणारे पंतप्रधान – नरेंद्र गायकवाड

नरेंद्र मोदी हे संविधानाला मानणारे पंतप्रधान आहेत. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जगभरातील स्मारकांसाठी केंद्र शासनाने व महायुती शासनाने मोठ्या प्रमाणात निधी दिला आहे. डॉ. आंबेडकर यांचा एवढा सन्मान यापूर्वी कधी झाला नव्हता. देशाला मागासवर्गीय व आदिवासी राष्ट्रपती देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णयही मोदी यांनीच घेतला. त्यामुळे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या आदेशानुसार पक्षाचे सर्व मते महायुतीलाच मिळतील, अशी ग्वाही नरेंद्र गायकवाड यांनी दिली. महिलांना लोकसभा व विधानसभेत ३३ टक्के आरक्षण हे केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळेच मिळणार आहे. महिलांना सक्षम करण्यासाठी अनेक योजना केल्यामुळे समस्त नारीशक्ती महायुतीच्या मागे उभे राहील, असे उमाताई मुंडे म्हणाल्या.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नीतेश पंडित यांनी केले तर संतोष भोईर यांनी आभार मानले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 7 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे