जालना कृषी उत्पन्न बाजार समितीला जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी भेट देवून पाहणी केली

जालना/प्रतिनिधी,दि.7
जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी आज जालना येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य बाजार पेठेतील फळे व भाजी मार्केटला प्रत्यक्ष भेट देवून येथील सोयी-सुविधांची पाहणी केली. यावेळी बाजार परिसराच्या पाहणी दरम्यान आवारातील अस्वच्छतेबाबत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करुन, फळे व भाजीपाला मार्केटची दररोज स्वच्छता करणेबाबत बाजार समितीला निर्देश दिले. यावेळी पाहणी दरम्यान अपर जिल्हाधिकारी रिता मैत्रेवार, कृषी उपसंचालक संजय कायंदे, बाजर समितीचे प्रशासक परमेश्वर वरखडे आणि सचिव भरत तनपुरे आदी उपस्थित होते.
यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी सेल हॉलमध्ये काही व्यापाऱ्यांनी अतिक्रमण केल्याबाबतची तक्रार केली असता, संबंधीत व्यापाऱ्यांना तात्काळ अतिक्रमण खाली करण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी श्रीमती मित्तल यांनी दिले. तसेच यावेळी जालना बाजार समितीच्या कार्यालयास भेट दिली असता, उपस्थित अधिकारी-कर्मचारी यांनी समाधानकारक उत्तरे न दिल्याने त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. कार्यालयीन कामकाजात तात्काळ सुधारणा करण्याचे निर्देश दिले. बाजार समितीचे पर्यवेक्षक, निरीक्षकांनी सकाळी 7.30 ते 3.30 वाजेपर्यंत तर अधिकारी-कर्मचारी यांना सकाळी 9.45 ते सायं. 6.15 वाजेपर्यंत बाजार परिसरात उपस्थित राहण्याबाबात सुचित केले. यावेळी त्यांनी बाजार समितीच्या प्रशासनास सूचना करुन शेतकऱ्यांकडून कोणत्याही प्रकारचा कडता, वराई व पैसा घेण्यात येवू नये अशा स्पष्ट सुचना दिल्या. जे आडते कडता, वराई व पसा घेतील. त्यांच्यावर नियमाप्रमाणे कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. ज्या आस्थापनेकडे विद्युत देयक व इतर येणे थकीत आहे. त्यांच्याकडून सक्तीने वसुल करण्याबाबतच्या सुचनाही त्यांनी केल्या. बाजार समितीच्या आवारात संरक्षण भिंत असून, ती संरक्षण भिंत ज्या ठिकाणी तोडून रस्ता केला आहे. तो रस्ता बंद करण्याबाबत बाजार समितीस निर्देश दिले. तसेच बाजार समितीच्या दैनंदिन कामकाजात सुधारणा करण्याच्या सूचना ही यावेळी जिल्हाधिकारी श्रीमती मित्तल यांनी बाजार समितीचे प्रशासक परमेश्वर वरखडे व सचिव भरत तनपुरे यांना केल्या.



