विकासाच्या प्रक्रियेत राज्य शासन शेतकरी, कष्टकरी आणि सर्वसामान्य जनतेच्या पाठिशी – पालकमंत्री पंकजा मुंडे

जालना/प्रतिनिधी,दि.1
राज्य शासन विविध कल्याणकारी योजनेच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे जीवन सुखकर करण्याचा प्रयत्न करत असून, विकासाच्या प्रक्रियेत राज्य शासन शेतकरी, कष्टकरी आणि सर्वसामान्य जनतेच्या पाठिशी सदैव उभे असल्याचे, असे प्रतिपादन राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल, पशुसवंर्धन मंत्री तथा जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री श्रीमती पंकजा प्रज्ञा गोपीनाथ मुंडे यांनी केले.
महाराष्ट्र दिनाच्या 65 व्या वर्धापन दिनानिमित्त जालना येथील पोलीस मुख्यालय मैदानावर श्रीमती मुंडे यांच्या हस्ते आज मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगी खासदार कल्याण काळे, आमदार अर्जुन खोतकर, जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जगदिश मिनियार, जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांची प्रमुख उपस्थिती होती.
पालकमंत्री श्रीमती मुंडे म्हणाल्या की, महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी योगदान व बलिदान देणाऱ्या सर्व ज्ञात-अज्ञात, महान विभूतींना मी सर्वप्रथम अभिवादन करते. महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. तेंव्हा पासूनच आपल्या महाराष्ट्र राज्याने सर्वच क्षेत्रामध्ये विकासाची मोठी भरारी घेऊन विविध क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती केली आहे. त्यामुळेच आज आपले महाराष्ट्र राज्य देशातील अग्रेसर राज्य म्हणून ओळखले जाते. विविध योजनांच्या यशस्वी अंमलबजावणीमुळे जालना जिल्हा देखील अग्रेसर राहिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आणि राज्याचे नाव देशात अग्रेसर ठेवण्यासाठी राज्य शासनाच्या प्रत्येक विभागाचा 100 दिवसांचा कृती आराखडा तयार करून, ठोस कामगिरी करण्याचा निर्णय घेतला आहे.
‘जागतिक वसुंधरा दिन’ निमित्त पर्यावरणाचे संवर्धन व संरक्षण करण्यासाठी पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या वतीने राज्यात 22 एप्रिल ते महाराष्ट्र दिन 1 मे, 2025 या कालावधीत ‘पर्यावरण वाचवा वसुंधरा सजवा’ (पर्यावरण बचाओ वसुंधरा सजाओ) हा उपक्रम यशस्वीरित्या राबविण्यात आला. या उपक्रमातंर्गत सर्वांनी आपल्या गावातील, आपल्या तालुक्यातील, आपल्या जिल्ह्यातील, आपल्या महानगरातील, पाण्याचे विविध स्त्रोत साफ केले आहेत. नद्या, नाले, तलावांची स्वच्छता केली. तसेच जालना शहरातून वाहणाऱ्या सीना-कुंडलिका नदी पात्रात मोठ्या प्रमाणात झालेली अतिक्रमणे काढून नदीची स्वच्छता करण्याचे काम करण्यात येत असल्याच त्यांनी सांगितले.
नागरिकांमध्ये जल साक्षरता वाढवणे, पाण्याच्या बचतीचे महत्व पटवून देणे आणि जल व्यवस्थापनाच्या शाश्वत उपाययोजना राबविण्यासाठी जलसंपदा विभागाच्यावतीने 15 ते 30 एप्रिल या कालावधीत ‘जल व्यवस्थापन कृती पंधरवडा’ साजरा करण्यात आला. या जल व्यवस्थापन कृती पंधरवड्याच्या माध्यमातून समाजात पाण्याच्या सुयोग्य वापराबाबत विविध उपक्रमाच्या माध्यमातून व्यापक जनजागृती करण्यात आली. जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात पाणी टंचाईकरिता आवश्यक त्या उपाययोजना केल्या आहेत. टँकर, पुरक नळ योजना, विहिर अधिग्रहण इत्यादी या उपाययोजनांद्वारे सर्वसामान्य नागरिकांना पाणी टंचाईचा त्रास होणार नाही. याबाबतच्या सूचना प्रशासनास देण्यात आल्या आहेत.
कृषि क्षेत्रात डिजिटल सेवांचा वापर करुन शासनाच्या विविध योजनांचा जलद गतीने व परिणामकारकरित्या लाभ शेतकऱ्यांना देणे सुलभ व्हावे याकरीता केंद्र शासनाची ‘अॅग्रिस्टॅक’ योजना राज्यात राबविण्यात येत असून, जिल्ह्यात सदर योजनेची अमंलबजावणी जलद गतीने सुरु आहे. जिल्ह्यात या योजने अंतर्गत सुमारे 3 लाख शेतकऱ्यांची नोंदणी झाली आहे. ‘ॲग्रीस्टॅक’ योजने अंतर्गत आपली नोंदणी आपली नोंदणी करुन घेण्याचे आवाहन पालकमंत्री श्रीमती मुंडे यांनी यावेळी केले.
जिल्ह्यातील महसूल प्रशासनाने गाव नकाशात असणारे रस्ते खुले करणे व बारमाही वापरता येण्यासारखे कायमस्वरुपी रस्ते तयार करण्यासाठी कालबध्द कार्यक्रम तयार केला आहे. यामध्ये कालबध्द रितीने रस्ते खुले करणे, तसेच मातोश्री ग्रामसमृध्दी शेत / पाणंद रस्ते योजनेअंतर्गत बारमाही वापरता येण्यासारखे कायमस्वरुपी रस्ते तयार करणे 1 मार्च ते 9 मे या कालावधीत हा कालबध्द कार्यक्रम जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. यामुळे जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांची कायमस्वरुपी अडचण दूर होणार आहे. प्रधानमंत्री पिक विमा योजना अंतर्गत खरिप हंगाम 2024-25 मध्ये 2 लाख 82 हजार शेतकऱ्यांना 107 कोटी रक्कम वितरीत करण्यात आली आहे. तसेच विविध शासन निर्णयानुसार डिसेंबर पर्यंत प्राप्त झालेला निधी वितरीत झाला असून, उर्वरीत निधीचे वितरण सुरु आहे. तसेच नैसर्गिक आपत्ती निधीचे वितरण सुरु आहे.
जालना जिल्ह्यात महत्वाच्या पायाभूत सुविधा उभारण्याचे काम प्रगतीपथावर सुरु आहे. यामध्ये जालना ड्रायपोर्ट, जालना-नांदेड समृध्दी महामार्ग आणि जालना-जळगाव रेल्वे मार्ग यांचा समावेश आहे. हे तिन्ही प्रकल्प सुरु झाल्यानंतर जालना जिल्ह्यातील उद्योगांना मोठ्या प्रमाणात चालना मिळणार असून, जिल्ह्याच्या विकासात देखील भर पडणार आहे.
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 ही महाराष्ट्र शासनाची महत्त्वकांक्षी योजना असून सदर योजने अंतर्गत शेतकऱ्यांना दिवसा वीज व अखंडित वीज पुरवठा करणे हे शासनाचे उद्दिष्ट आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने या योजनेकरीता जिल्ह्यातील 47 उपकेंद्रासाठी 610 हेक्टर जमीन प्रदान केली आहे. या योजने अंतर्गत जालना जिल्ह्यात सहा ठिकाणी 29 मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आले आहेत. या व्यतिरिक्त जिल्ह्यात 36 उपकेंद्राकरीता 186 मेगावॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याचे काम प्रगतीपथावर आहे.
‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना’ या योजनेअंतर्गत जालना जिल्ह्यातील 800 लाभार्थी मागील महिन्यात जालना येथुन अयोध्या येथे जाऊन दर्शन घेवून सुखरुप परतले आहे. बालविवाह रोखण्यासाठी मागील कालावधीत जिल्ह्यात चांगले काम झाले असून, जिल्ह्यात मागील वर्षात 144 बाल विवाह रोखण्यात महिला व बालविकास विभागाला यश आले असल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच आज आपण आंतरराष्ट्रीय कामगार दिन साजरा करीत असून, देशाला प्रगतीपथावर आणण्यामध्ये कामगार बांधवांचा महत्वाचा वाटा आहे. त्याकरीता त्यांचे अभिनंदन करुन त्यांना मन:पूर्वक शुभेच्छा देते. कामगार बांधवासाठी राज्य शासनाने महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची स्थापना केली आहे. या मंडळाचा मुख्य उद्देश हा विविध योजनांद्वारे इमारत व इतर बांधकाम कामगारांना सुरक्षा तसेच आरोग्य व इतर कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देणे हा आहे. या मंडळाअंतर्गत विविध कल्याणकारी योजना राबविल्या जातात. कामगारासाठी असलेल्या सर्व योजने अंतर्गत कामगारांना सुमारे 72 करोड रुपये अर्थसहाय्य देण्यात आले आहे. तसेच केंद्र शासनाच्या ‘नमो कामगार कल्याण अभियान’ अंतर्गत 4 हजार कामगारांना अत्यावश्यक संच व सुरक्षा संच वितरीत करण्यात आले आहे. तर अत्यावश्यक संच व सुरक्षा संच योजने अतंर्गत 99 हजार कामगारांना अत्यावश्यक संच व सुरक्षा संचाचा लाभ देण्यात आला आहे. तसेच सप्टेंबर 2024 पासून इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाने प्रत्येक तालूक्यात ‘तालूका कामगार सुविधा केंद्र’ स्थापन केले आहे. याठिकाणी कामगारांची नोंदणी, नुतनीकरण व लाभाचे अर्ज तपासणी केली जात असल्याची त्यांनी माहिती दिली.
पालकमंत्री श्रीमती मुंडे यांनी प्रारंभी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या अत्यंत संतापजनक, निंदनीय भ्याड दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या सर्व निरापराध नागरिकांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण केली. तसेच त्यांच्या कुटूंबियांना या दु:खातून सावरण्यास सामर्थ्य मिळो यासाठी प्रार्थना करत असल्याचे सांगत, या हल्ल्यात जखमी झालेल्या नागरिकांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी अशी इच्छा व्यक्त केली. तसेच निरापराध नागरिकांना लक्ष्य बनवणे ही मानवता विरोधी कृती आहे असल्याचे सांगुन अशा भ्याड हल्याचा त्यांनी जाहीर निषेध व्यक्त केला.
यावेळी पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी परेड निरीक्षण केले. त्यानंतर विविध पथकांनी संचलन केले. पोलीस शहर व ग्रामीण यंत्रणेचे पथक, वाहतूक नियंत्रण विभाग, गृह रक्षक दल, शीघ्र प्रतिसाद दल यांच्यासह अग्निशमन दल, श्वान पथक, आपत्ती व्यवस्थापन वाहन, 108 रूग्णवाहिका आदि वाहनांचा संचलनात उत्स्फूर्त सहभाग होता. पोलीस वाद्यवृंद पथकाच्या स्फूर्तीदायक महाराष्ट्र गीतांच्या वादनाने कार्यक्रमाची रंगत वाढवली.
यावेळी पालकमंत्री पंकजा मुंडे हस्ते विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. मुख्य ध्वजारोहणाच्या कार्यक्रमास यावेळी स्वातंत्र्यसैनिक, लोकप्रतिनिधी, अधिकारी-कर्मचारी, पत्रकार व नागरिक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.