त्रिमूर्तीच्या बालसैनिकांची महापुरुषांच्या स्मारकांना मानवंदना
रोहिणी डोंगरे व सहकारी विद्यार्थ्यांच्या नेत्रदीपक संचालनास अंबडकरांची दाद

अनिल भालेकर/ स्पेशल रिपोर्ट,दि.19
शारीरिक बळकटी, शिस्तपालन तसेच राष्ट्रभक्ती याचे बाळकडू विद्यार्थ्यांना विद्यार्थी दशेत देणे गरजेचे असते. सैनिकी शिक्षणामुळे विद्यार्थ्यांचा शारीरिक विकास तर होतोच तसेच भविष्यातील एक आदर्श नागरिक म्हणून ते आपले कर्तव्य प्रामाणिकपणे व निष्ठापूर्वक बजावतात.विद्यार्थ्यांना सैनिकी शिक्षण देण्यासाठी महाराष्ट्रात प्रसिद्ध असणाऱ्या अहमदनगर जिल्ह्यातील त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान संचलित,तेलकुडगाव येथील घाडगे पाटील विद्यालय प्रसिद्ध आहे. याच विद्यालयातील बालसैनिकांनी अंबड शहरांमध्ये 15 ऑगस्टच्या निमित्ताने शहरातील महापुरुषांच्या स्मारकांना संचलन करत मानवंदना दिली.हा सोहळा पाहण्यासाठी अनेकांची तोबा गर्दी झाली होती. नेत्र दीपक असा हा संचलनाचा क्षण अनेकांनी आपल्या मोबाईल मध्ये कॅमेराबद्ध केला. अंबड शहरांमध्ये यापूर्वी असे संचलन व मानवंदना कधीच झाली नसल्याची भावना अनेकांनी उस्फूर्तपणे कौतुक करत व्यक्त करून दाखवली.
टीम कॅप्टन रोहिणी डोंगरे संचलन करणाऱ्या विद्यार्थ्यांचे नेतृत्व करत होती. तिच्या नेतृत्व कौशल्याचे अनेकांनी तोंड भरून कौतुक केले. राष्ट्रीय महामार्गावरील असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक तसेच मुख्य बाजारपेठेत असणारे महात्मा ज्योतिबा फुले स्मारकांना दिमागदार संचलनाने या बालसैनिकांनी मानवंदना दिली.
सर्वांच्या कुतुहालाचा विषय ठरणारे हे संचलनाचा समारोप अंबड शहरातील सर्वात मोठी विद्यार्थी संख्या असणारे विद्यालय म्हणून ओळख असणाऱ्या मत्स्योदरी विद्यालय येथे करण्यात आला. हजारो विद्यार्थ्यांसमोर या बाल सैनिकांनी संचलनाचे तसेच काठी फिरवण्याचे प्रात्यक्षिक दाखवले. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी यावेळी टाळ्याच्या गजरात बालसैनिकाचे अभिनंदन व कौतुक केले. यावेळी मत्स्योदरी शाळेच्या वतीने रोहिणी डोंगरे सह इतर सहकारी विद्यार्थ्यांचा तसेच प्रकाश रुपवते, संतोष जेधे, संदीप डोंगरे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
अस्मरणीय संचलन मानवंदना संपन्न करण्यासाठी प्रकाश मामा रुपवते,संतोष जेधे, राजेंद्र भोसले संदीप डोंगरे, विजय शेळके, राजू पाटील डोंगरे, राजेंद्र भोसले, मनोहर जामधरे, श्याम फलके, वैद्य सर तसेच कर्जत येथील ग्रामस्थ यांनी कठोर मेहनत घेत नेत्र दीपक सोहळा आयोजित केला.
बालसैनिकांनी संचलन करत केलेली मानवंदना सर्वत्र चर्चिले जात असून बालसैनिकाचे विशेष कौतुक व अभिनंदन केले जात आहे.