जालना येथे बुधवारी प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन
जालना/प्रतिनिधी,दि.13
नोकरीच्या शोधात असलेल्या जालना जिल्ह्यातील युवक-युवतींना विविध खासगी कंपन्या, कारखाने, उद्योग-व्यवसाय आणि आस्थापना यांचेकडील रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्याच्या उद्देशाने प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी रोजगार सहाय्यासाठी विशेष मोहिम सुरू करण्यात आली आहे. तरी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, प्रशासकीय इमारत, जालना येथे बुधवार दि. 18 सप्टेंबर, 2024 सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत प्लेसमेंट ड्राईव्ह-जागेवर निवड संधी आयोजित करण्यात आली आहे.
मेळाव्यासाठी बीएसएस मायक्रो फायनान्स लिमिटेड प्रायव्हेट लिमिटेड जालना यांची बारावी उत्तीर्ण युवक-युवतींसाठी वसुली अधिकारी 25 पदे तसेच अनुभव असलेल्या बारावी उत्तीर्ण युवक-युवतीसाठी सेल्स अधिकारी 25 पदे अशी एकूण 50 रिक्त पदे प्राप्त झालेली आहेत. याकरीता नोकरी इच्छुक पात्रताधारक उपस्थित होणाऱ्या उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेण्यात येवून जागेवरच निवडीची संधी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. जालना जिल्ह्यातील नोकरी इच्छुकांनी या संधीचा लाभ व अधिक माहिती घेण्यासाठी विभागाच्या www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. व प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये सहभागी होवून रोजगाराच्या पर्वणीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक आयुक्त, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.