अमरावती- वऱ्हा ते तिवसा सायंकाळची बस सुटते रात्री:तिवसा बसस्टँडवर विद्यार्थी करतात प्रतीक्षा

मोर्शी/त्रिफुल ढेवले,दि.6
अमरावती आगारातून सुटणारी अमरावती-वऱ्हा-माळेगा व ते तिवसा ही एसटी बस वेळेवर धावत नाही. त्यामुळे तिवसा येथे शालेय व महाविद्यालयीन शिक्षण घेण्याकरिता एसटी बसने प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांचे तसेच विविध कामांसाठी तिवसा येथे तालुक्याच्या ठिकाणी कामासाठी येणाऱ्या प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. कित्येक वेळा त्यांना रात्री उशिरापर्यंत बसच्या प्रतिक्षेत ताटकळत बसावे लागते. यामध्ये विद्यार्थिंनीचाही समावेश असल्याने त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाल्याने पालकांसह प्रवाशांनाही संताप व्यक्त केला आहे.तिवसा हे तालुक्याचे ठिकाण असल्याने येथे दिवाणखेड, चिखली, मार्डी, माळेगाव येथील नागरिक विविध कामांसाठी दररोज येतात. त्यामध्ये शालेय व महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनी व विद्यार्थ्यांची संख्यादेखील मोठी आहे. एकमेव फेरी असलेली ही बस तिवसा येथून वऱ्हा मार्गे अमरावती या परतीच्या प्रवासासाठी सायंकाळी साडे पाचच्या सुमारास निघते. मात्र, ही एसटी बस अनेकदा वेळेवर येत नाही. ती रात्री सात, आठ वाजता येते. त्यामुळे विद्यार्थ्यांसह ज्येष्ठ, गर्भवती महिला व प्रवाशांना गैरसोईची सामना करावा लागतो.सध्या उन्हाळा सुरू असल्याने विद्यार्थी व प्रवाशांना बसच्या प्रतिक्षेत बसस्थानकात बसून रहावे लागते. त्यामुळे विद्यार्थिनींसह महिलांच्या सुरक्षेचा प्रश्नदेखील निर्माण झाला आहे. पर्यायी व्यवस्था नाही; वेळेवर बस सोडावी ^शाळा ५ वाजता सुटते. परंतु, एसटी बस तिवसा बसस्थानकात दररोज दीड ते दोन तास उशिरा येत असल्याने घरी जाण्यास उशिर होतो. त्यामुळे घरचेही अनेकदा चिंतेत असतात. शाळेत जाण्या-येण्यासाठी पर्यायी व्यवस्था नाही. परीक्षेचा काळ जवळ येत असल्याने निदान आता तरी शासनाने वेळेवर बस सोडण्याची व्यवस्था करावी. -उन्नती भुरे, विद्यार्थिनी.रात्री उशिरापर्यंत बसची प्रतीक्षा ^वऱ्हा, माळेगाव ते तिवसा एसटी बस नियमित वेळेवर पोहोचत नाही. त्यामुळे अनेकदा बसस्थानकावर शालेय विद्यार्थी तसेच प्रवाशांना रात्री उशिरापर्यंत बसच्या प्रतिक्षेत ताटकळत रहावे लागते. परिणामी विद्यार्थ्यांसह वृद्ध व गर्भवती महिलांना अडचणींचा सामना करावा लागतो. -हेमंत शिरपुरे, प्रवासी.आर्थिक भूर्दंड; जादा बस फेरीची मागणी अनेक वेळा एसटीची प्रतीक्षा करूनही ती वेळेवर पोहोचत नसल्याने प्रवाशांना खासगी वाहनाने अधिक पैसे देऊन घर गाठावे लागते. त्यामुळे त्यांना आर्थिक भूर्दंड सहन करावा लागतो. एसटी महामंडळाने ही फेरी वेळेवर सोडावी तसेच या मार्गे जादा फेरीचे नियोजन करावे, अशी मागणी विद्यार्थी व प्रवाशांच्या वतीने वऱ्हा येथील सामाजिक कार्यकर्ते हेमंत शिरपुरे यांनी केली आहे.