pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

गोर गरीबांची सेवा करण्यातच खरा आनंद दडला आहे – सत्यपाल महाराज

संत गाडगेबाबा पुरस्काराचे वितरण; रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

0 1 7 4 1 1
जालना/प्रतिनीधी,दि.22
रक्तदान,देहदान,अवयवदान आणि नेत्रदानातच देवाचे देवत्व आहे.देव हा बाजारातला भाजीपाला नाही.रंजल्या,गांजलेले आणि अपंगाची सेवा करून त्यांना अन्नदान करण्यामध्येच खरा आनंद असल्याचे प्रतिपादन प्रसिद्ध सप्त खंजेरीवादक प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांनी येथे बोलतांना केले.
राष्ट्रसंत गाडगे बाबा यांच्या ६७ व्या पुण्यतिथी निमित्त जालना येथील डेबूजी परिवार आणि गुरू शिष्य परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने जुना जालना भागातील महालक्ष्मी मंदिरात बुधवारी सकाळी आयोजित करण्यात आलेल्या भव्य रक्तदान शिबिरात मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.यावेळी परिट समाजाचे ज्येष्ठ नेते सुभाषराव वाघमारे,प्रदेश उपाध्यक्ष मोहन इंगळे,जिल्हाध्यक्ष किशोर आगळे,डेबूजी व गुरू शिष्य परिवाराचे प्रमुख आदर्श शिक्षक किशोर खंडाळे,वसंतराव राऊत,गणेशराव इंगळे,अनिल खंडाळे,सुभाष घोडके,काशिनाथ मेव्हणकर,कैलास वाघमारे,संतोष शिंदे,रमेश पैठणकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी पुढे बोलतांना सत्यपाल महाराज महणाले की,गाडगे बाबा निघून गेले याचे दुःख नाही. जो आपल्यासाठी जगतो, ते जगणे नाही ! आणि जो सेवेत मरतो, तो मरत नाही !! अशा शब्दात गाडगे बाबा यांच्या कार्याचा उल्लेख करून ते म्हणाले की, रक्तदान,अवयवदान,देहदान,नेत्रदान हे सर्वश्रेष्ठ दान असून अशा उपक्रमांना आपण स्वतः नेहमीच प्राधान्य देतो.आपण स्वतःच्या पत्नीचे,आई आणि वडिलांचे देहदान दिल्याचे सांगून  ” मंदिरी बसुनी नाक दाबावे, त्यापेक्षा रस्त्यावरचे काटे उचलावे ” असा संदेश गाडगे बाबांनी आम्हाला दिला आहे.गाडगे बाबा यांनी फक्त गाव स्वच्छ केली नाही तर प्रत्येकाची अंतर्मन देखील स्वच्छ करण्याचे काम केले आहे.डेबूजी परिवार आणि गुरू शिष्य परिवार यांच्याकडुन रक्तदानाच्या राबविण्यात येत असलेल्या उपक्रमाचे कौतुक करत सत्यपाल महाराज म्हणाले की,रक्तदान म्हणजे अभिमान आहे.कारण देव देवळात नाही असे गाडगे बाबांनी सांगितले आहे.खरा देव हा रक्तदानात असून दारू पिऊन भांडण करण्यापेक्षा सलाईनवर असलेल्या एखाद्या गरजू रुग्णाला आपल्याला रक्तदानासाठी मदत करून त्याचा जीव वाचवता आला तर यापेक्षा मोठे कार्य असूच शकत नाही. ” कुणी न रहावे अडाणी,शिक्षण घ्यावे व्हावे  ज्ञानी ” अशा सरळ सोप्या भाषेत गाडगे बाबा यांनी गावो गावी कीर्तनाच्या माध्यमातून शिक्षणाचे महत्व पटवून देण्याचे मौलाचे कार्य केले आहे.स्वतः अशिक्षित असतांना शिक्षणाचे महत्व पटवून देतानाच गोरगरीब आणि गरजुंसाठी गाडगे बाबा यांनी मुंबई,नागपूर,पंढरपूर आदी ठिकाणी धर्मशाळा बांधून त्यांना आसरा देण्याचे महत्त्वाचे कार्य केले आहे.अमरावती येथील विद्यापीठाला संत गाडगेबाबा यांचे तर नागपूर येथील विद्यापीठाला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे नाव देण्यासाठी अनेक वर्ष लढा द्यावा लागला असल्याचे सत्यपाल महाराज शेवटी म्हणाले.या कार्यक्रमात सर्वाधिक ६५ वेळा रक्तदान केल्याबद्दल सुरेशराव वाघमारे यांच्यासह सलग सहा वेळा रक्तदान केल्याबद्दल कैलास वाघमारे आणि सौ.मीराबाई वाघमारे यांचा तसेच श्रीमती ताराबाई आगळे आणि छत्रपती संभाजीनगर येथील साईनाथ हजारे यांचा उल्लेखनीय कार्याबद्दल सप्त खंजिरीवादक सत्यपाल महाराज,सुभाषराव वाघमारे,गणेश इंगळे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह,प्रशस्तीपत्र देऊन त्यांना संत गाडगेबाबा पुरस्काराने गौरविण्यात आले.यावेळी रक्तदान शिबिरात एकूण ५४ जणांनी सहभागी होऊन रक्तदान केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किशोर खंडाळे यांच्या मार्गदर्शनाखाली रोशन इंगळे,सचिन शिंदे,मंगेश इंगळे,प्रतीक आगळे,सचिन शेलार आदींनी परिश्रम घेतले.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 1 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे