आमदार वानखडेंनी घेतला तिवसा तालुक्याचा आढावा:तहसीलदारांच्या उपस्थितीत पार पडली बैठक

मोर्शी/त्रिफुल ढेवळे,दि.22
मोर्शी : तिवसा तहसील कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत आमदार राजेश वानखडे यांनी तालुक्यातील विविध कामांचा आढावा घेतला. बैठकीत शेतकरी तसेच नागरिकांकडून प्राप्त प्रकरणे जागीच निकाली काढण्यात आली. या प्रसंगी प्रलंबित प्रकरणांचा जलद गतीने निपटारा करण्याच्या सूचना त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या. आढावा बैठकीला तहसीलदार, बीडीओ, नायब तहसीलदार, पंचायत, पाटबंधारे, महसूल, कृषी, जलसंधारण, क्रीडा, आरोग्य, महिला व बालकल्याण, वन विभाग, सामाजिक वनीकरण, ग्रामीण रुग्णालय, सहकार, विद्युत, भूमि अभिलेख आदी विभागांचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत तालुक्यातील घरकुले, शेतरस्ते मातीकाम, खडीकरण व मजबूतीकरण, शेत रस्त्यांच्या दुतर्फा वृक्ष लागवड, फळबाग लागवड, स्मशानभूमी कामे, वनीकरण, जल जीवन मिशन अंतर्गत कामे, गोठे, शेततळे, आरोग्य सुविधा, जंगली जनावरे आदींसह महावितरण, पाणीपुरवठा व सार्वजनिक बांधकामांसह इतर विभागांशी निगडित कामांचा आढावा घेण्यात आला. या प्रसंगी आमदारांनी उपस्थित अधिकाऱ्यांना फळबाग लागवड केलेल्या शेतकऱ्यांना प्राधान्याने अनुदान मंजूर करावे, घरकुल लाभार्थ्यांची यादी प्रसिद्ध करून त्यांना लाभ द्यावा, पाणंद व गाडीरस्ते अतिक्रमण मुक्त करून त्याचे मातीकाम करावे, शासनाने मंजूर केलेली तसेच जिल्हा नियोजन निधीमधून मंजूर झालेली सर्व कामे विहित वेळेत पूर्ण करावी. तालुका स्तरावर मूलभूत, अल्पसंख्याक विकास, सामाजिक न्याय, तांडा वस्ती तसेच जिल्हा वार्षिक योजना निधी अंतर्गत गावातील जनसुविधा योजना त्वरित जॉबचे वितरण करावे आदी सूचना दिल्या. या बैठकीला या अधिकाऱ्यांसह सर्वच विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी, सरपंच, मोठ्या संख्येने उपस्थित होते. आढावा बैठकीला उपस्थित आ. वानखडे व अन्य अधिकारी, कर्मचारी.