सारडे गावातील घरांच्या मोजणी कार्यक्रमाचे उदघाटन.
सारडे ग्रामविकास समितीच्या वतीने विस्तारित गावाला गावठाण म्हणून मान्यता मिळवून देण्यासाठी प्रयत्न.

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.10
रविवार दिनांक ९ फेब्रुवारी २०२५ रोजी सारडे ग्रामविकास समितीच्या वतीने समिती कार्यालयात सारडे गावातील घरांच्या मोजणी कार्यक्रमाचा उदघाटन सोहळा पार पडला.या कार्यक्रमाचे उदघाटक एमएमआरडीए भूसंपादन विरोधी समितीचे अध्यक्ष सुधाकर पाटील यांनी सारडे ग्रामविकास समितीच्या विस्तारित गावाला गावठाण म्हणून मान्यता मिळण्यासाठी च्या प्रयत्नांचे कौतुक केले.सारडे ग्रामविकास समितीचा गावठाण लढा हा उरण तालुक्यातील गावांना आदर्श ठरेल असे सांगितले.समितीचा ह्या कामी पाठपुरावा व विविध मंत्रालय,जमाबंदी आयुक्त,संबधित महसूल विभागां सोबत केलेल्या पत्रव्यवहार ही समितीची जमेची व कायदेशीर बाजू असल्याचे प्रतिपादन केले.
सारडे ग्रामविकास समितीचे अध्यक्ष मनोज पाटील यांनी समितीच्या पुढील कामाच्या नियोजनाची माहिती दिली.तसेच गावाच्या सीमांकना नंतर घरांचा सर्व्हे हा विस्तारित गावाला गावठाण म्हणून मान्यता मिळण्याच्या कामी महत्वाचे पाऊल असून,एमएमआरडीए, एमआयडीसी सारखे शेती,गाव व घरे उध्दवस्त करणारे प्रकल्प डोक्यावर टांगते असताना समितीचे कार्य हे अनमोल यथोचित आहे हे आपल्या भाषणात विषद केले.समितीचे सल्लागार एस.के.म्हात्रे यांनी गावातील, शासकीय नोकरीतून निवृत्त ग्रामस्थांनी आपल्या अनुभव व ज्ञानाचा फायदा गावठाण मान्यतेच्या लढ्यात द्यावा व आपले योग्य उत्तरदायित्व पार पाडावे असे प्रतिपादन केले. सारडे सरपंच रोशन पाटील यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.तसेच सुधाकर पाटील यांनी सारडे ग्रामविकास समितीचे काम अन्य व्यासपीठावरून विषद करावे अशी विनंती केली.
या कार्यक्रमाचे वेळी समितीचे उपाध्यक्ष संदीप पाटील,खजिनदार प्रितम म्हात्रे,सचिव विशाल म्हात्रे,महेश पाटील,संतोष माळी,सागर पाटील,राज पाटील, भूषण म्हात्रे,शक्ती वर्तक,सन्नी पाटील,आदेश पाटील,देवेंद्र पाटील आदी समितीचे कार्यकर्ते हजर होते.तसेच माजी उपसरपंच श्यामकांत पाटील,जी.आर.म्हात्रे सर,संपेश पाटील,रोशन पाटील,रोहन पाटील व सर्व्हेर सोमनाथ कोळी व त्यांची टीम हजर होती.