जिल्हाधिकारी कार्यालयात माजी न्यायमुर्ती संदीप शिंदे यांनी घेतला कुणबी नोंदी व प्रमाणपत्र वाटपाचा आढावा
जालना/प्रतिनिधी,दि.20
कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी-मराठा या स्वरूपाच्या आढळलेल्या नोंदींच्या आधारे पात्र व्यक्तींना जात प्रमाणपत्रे देण्यासाठी विहित कार्यपद्धती निश्चित करण्याकरिता स्थापन करण्यात आलेल्या समितीची महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. समितीचे अध्यक्ष माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात ही बैठक संपन्न झाली. या बैठकीत न्यायमूर्ती शिंदे यांनी जिल्ह्यातील कुणबी नोंदी शोधण्याच्या मोहिमेचा आणि आतापर्यंत वितरित करण्यात आलेल्या प्रमाणपत्रांचा, जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचा सविस्तर आढावा घेतला. तसेच जालना जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांना जात प्रमाणपत्रे देण्याची प्रक्रिया अधिक सुलभ आणि गतिमान करण्याबाबत त्यांनी प्रशासनाला आवश्यक सूचना केल्या.
कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी-मराठा आढळुन आलेल्या नोंदीच्या आधारे पात्र व्यक्तींना जात प्रमाणपत्र देणेबाबतची कार्यपध्दती विहीत करण्यासाठी गठित समिती अध्यक्ष मा.न्यायमुर्ती संदीप शिंदे (निवृत्त) यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील आढावा बैठकीस जिल्हाधिकारी आशिमा मित्तल, अपर जिल्हाधिकारी रमेश मिसाळ, निवासी उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल यांच्यासह सर्व उपविभागीय अधिकारी, सर्व तहसीलदार यांची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्हा प्रशासनाकडून दि.18 फेब्रुवारी 2026 अखेर कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी-मराठा नोंदणी साठी विविध विभागांच्या अभिलेख्यांवरुन 22 लक्ष 74 हजार 82 तपासलेल्या नोंदी आहेत यामध्ये कुणबी जातीच्या एकुण 5027 नोंदी आढळुन आलेल्या आहेत. यामध्ये महसूल विभाग-2455, भुमि अभिलेख विभाग-1844, शिक्षण वि भाग-90, जिल्हा उपनिबंधक कार्यालय जालना- 403, महानगरपालिका (जन्म-मृत्यू नोंदी)-185, ग्रामपंचायती (जन्म-मृत्यू नोंदी)-185 आणि सेवा अभिलेखे सेवापट- 3 अशा एकुण 5027 कुणबी नोंदी आढळुन आलेल्या आहेत. मा .न्या.संदीप शिंदे (निवृत्त) समिती स्थापन झाल्यापासून जालना जिल्ह्यातील सर्व तालुक्यात आढळुन आलेल्या नोंदी व वाटप करण्यात आलेल्या जात प्रमाणपत्रामध्ये जालना नोंदी 428 तर जात प्रमाणपत्रे 1153, बदनापूर नोंदी 102 आणि जात प्रमाणपत्रे 1317, अंबड नोंदी 238 तर जात प्रमाणपत्रे 3140, घनसावंगी नोंदी 29 तर जात प्रमाणपत्रे 494, भोकरदन नोंदी 2709 तर जात प्रमाणपत्रे 5899, जाफ्राबाद नोंदी 411 तर जात प्रमाणपत्रे 886, परतूर नोंदी तर जात प्रमाणपत्रे 2088 आणि मंठा नोंदी 457 तर जात प्रमाणपत्रे 1680 मिळण्यासाठी अर्ज प्राप्त झाले आहेत. यामध्ये परतूर तालुक्यात 1 व मंठा तालुक्यात 18 असे एकुण 19 अर्ज नाकारलेले आहेत तर प्रलंबित अर्ज निरंक आहेत. दि.02.09.2025 च्या शासन निर्णयानूसार जिल्ह्यातील एकुण 1033 ग्राम महसूल अधिकारी, सहायक कृषी अधिकारी आणि ग्रामपंचायत अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण घेण्यात आले आहे. दि.02.09.2025 रोजीच्या शासन निर्णयानूसार हैद्राबाद गॅझेटीअर मधील नोंदी विचारात घेवून कुणबी, किंवा मराठा कुणबी किंवा कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र वाटपात प्राप्त अर्ज 193 आणि मान्य केलेले अर्ज 74 तर नाकारलेले अर्ज 4 आणि प्रलंबित असलेले अर्ज 115 आहेत. जिल्ह्यात जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे जात प्रमाणपत्र वैधतेसाठी एकुण 112 अर्ज दाखल झालेले असून पडताळणी समितीने 745 प्रमाणपत्र वैध ठरविले आहेत. अवैध 23 अर्ज ठरविले तर इतर कारणांनी निकाली 123 अर्ज काढले सध्या पडताळणी समितीकडे 231 अर्ज प्रलंबित आहेत. यात 1 ते 90 दिवसातील 187 तर 90 दिवसाच्यावरील 44 अर्ज आहेत. अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने यावेळी देण्यात आली.
-*-*-*-*-



