भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन
जालना/प्रतिनिधी,दि.9
सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागामार्फत भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहानिमित्त विविध कार्यक्रमाचे दि. 8 एप्रिल ते 14 एप्रिल 2025 पर्यंतच्या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे. तरी विविध कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक आयुक्त, समाज कल्याण, जालना यांनी केले आहे.
अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व वंचित दुर्बल घटकातील व्यक्तींच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय साध्य करण्यासाठी राज्य शासनाकडून विविध कल्याणकारी योजनांची माहिती सर्वसामान्य जनतेला व्हावी तसेच जनतेत जनजागृती निर्माण व्हावी या उद्देशाने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. यामध्ये कार्यक्रमाचे उद्घाटन, भारतीय संविधानाची उद्देशिका, प्रस्ताविका यांचे वाचन, भारतीय जनतेत संविधानाविषयी जनजागृती निर्माण करणे, विविध स्पर्धा, कार्यशाळा, मेळावा, व्याख्यान आदि कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.