पालक सचिव यांनी घेतला विकास कामाचा आढावा
पालक सचिव पराग जैन यांनी घेतला जिल्ह्यातील विविध विकास कामांचा आढावा

जालना/प्रतिनिधी,दि.13
माहिती व तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव तथा जालना जिल्ह्याचे पालक सचिव पराग जैन यांनी आज जालना येथे भेट देवून, जिल्ह्यातील विविध विकास कामांचा सविस्तर आढावा घेतला. विविध विभागांच्या माध्यमातून जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी सर्वांनी नियोजन करुन विकास कामे करावीत अशा सूचना पालक सचिव पराग जैन यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित आढावा बैठकीत पालक सचिव श्री. जैन हे बोलत होते. यावेळी बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी एस. आर. पठारे, निवासी उपजिल्हाधिकारी गणेश महाडीक, उपजिल्हाधिकारी नम्रता चाटे, मनपा आयुक्त संतोष खांडेकर जिल्हा नियोजन अधिकारी श्री. सुर्यवंशी, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री. कापसे यांच्यासह विविध विभाग प्रमुखांची उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित बैठकीत श्री. जैन यांनी जिल्ह्यात झालेल्या विकास कामांबाबत समाधान व्यक्त केले. तसेच प्रत्येक विभागाचा आढावा घेत संबंधीत विभागाच्या समस्या जाणून घेतल्या. बैठकीच्या सुरुवातीस श्री. जैन यांनी प्रशासनाकडून जिल्ह्यात होणारे जालना ते जळगाव रेल्वे मार्ग, जालना ते नांदेड द्रूतगती महामार्ग, जालना खरपूडी (सिडको), पवित्र, ड्रायपोर्ट, प्रादेशिक मनोरुग्णालय, रेशीम उद्योग व हातमाग प्रशिक्षण केंद्र, मॅजीक इन्क्युबेशन सेंटर, मोसंबी-एक जिल्हा एक उद्योग, महादिप-एक संकल्प आदी प्रकल्पाची सविस्तर माहिती घेतली. तसेच महसूल, कृषी, रेशीम, भूसंपादन, क्रीडा, नगररचना, जल जीवन, जिल्हा नियोजन समिती अंतर्गत प्रारुप आराखडा आदींचा त्यांनी संबंधित विभाग प्रमुखांकडून यावेळी आढावा घेतला.
यावेळी पालक सचिव श्री. जैन म्हणाले की, जिल्हा प्रशासनाने महानगर पालिका क्षेत्रातील नगर भूमापन मिळकतींचे जी.आय.एस. आधारीत सर्व्हेक्षणाकरीता सुरु केलेला ‘पवित्र’ हा कार्यक्रम अत्यंत चांगला आहे. या जिल्ह्यातील उद्योगांना कोणत्या प्रशिक्षीत कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. याचा अभ्यास करुन मॅजीक इन्क्युबेशन सेंटरच्या माध्यमातून उमेदवारांना प्रशिक्षण द्यावे. तसेच मोसंबी-एक जिल्हा एक उद्योग करीता डिजिटल कॉमर्ससाठी ओपन नेटवर्कचा उपयोग करावा. तसेच याचे शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात यावे. कोणतीही योजना राबवितांना त्या माध्यमातून होणारा फायदा किंवा लाभावर लक्ष केंद्रीत करुन निधी खर्च केल्यास त्या योजनेचा सामान्य जनतेला नक्कीच फायदा होण्यास मदत होते. त्यानुसार प्रत्येक योजनेचे नियोजन करुन ती राबविण्यात यावी. सर्व शासकीय विभागांचे मंत्रालय स्तरावर असलेल्या प्रलंबित प्रश्नांचा पाठपुरावा करण्याची ग्वाही दिली. तसेच शासनस्तरावर 100 दिवस कृती आराखड्याचा नियमित आढावा घेण्यात येणार आहे. त्याकरीता शासकीय कार्यालयांचे संकेतस्थळ अद्ययावत करणे, ‘ईज ऑफ लिव्हिंग’ संकल्पनेवर काम करणे, शासकीय कार्यालयात स्वच्छता मोहीम राबविणे, नागरिकांच्या तक्रारी, प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढणे,क्षेत्रीय दौरे याचे नियोजन करुन तसेच उद्दिष्ट ठेवून काम करावे अशा सूचना ही श्री. जैन यांनी यावेळी दिल्या.
यावेळी जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी जिल्ह्यातील विविध योजनांच्या प्रगतीचे तसेच होणाऱ्या प्रकल्पाचे सादरीकरण केले.