कोतवाल पद भरतीसाठी 6 जुलै रोजी परिक्षा जालना शहरातील 14 परिक्षा केंद्रांवर होणार परिक्षा
जालना/प्रतिनिधी,दि.26
जालना जिल्हयातील सर्व तालुक्यांतील कोतवाल संवर्गातील रिक्त पदे भरण्याकरीता सर्व तालुका निवड समितीकडून उक्त पदभरतीची प्रक्रिया केंद्रीय पद्धतीद्वारे पूर्ण करण्याबाबत सर्व उपविभागीय अधिकारी तथा अध्यक्ष, तालुका कोतवाल निवड समिती यांच्या सर्वानुमते सदर परीक्षा ही शनिवार, दिनांक 6 जुलै 2024 रोजी दुपारी 3.30 ते 5.00 या कालावधीत, जालना शहरातील 14 परीक्षा केंद्रांवर परीक्षा घेण्यात येणार आहे.
यापूर्वी दि. 7 ऑक्टोबर 2023 रोजी कोतवाल पद भरतीसाठी घेण्यात आलेल्या परिक्षेत झालेल्या गैरप्रकारामुळे पदभरती रद्द करण्यात आली होती. आता कोतवाल पद भरतीसाठी ही परिक्षा 6 जुलै 2024 रोजी होणार आहे.
सदर पदभरती प्रक्रिया अत्यंत पारदर्शक व भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी दक्षता घेण्यात येत आहे. जालना शहरातील परीक्षा केंद्रांवर परीक्षेपुर्वी तसेच परीक्षेस बसल्यानंतर परीक्षार्थी यांची झडती / तपासणी करण्यात येणार असून त्यासाठी आवश्यक तो पोलीस बंदोबस्त उपलब्ध करुन देणेबाबत पोलीस प्रशासनास सुचित करण्यात आले आहे. परीक्षा केंद्रावर सीसीटिव्ही व वेबकास्टींक करणेबाबत नियोजन असून परीक्षेस येणा-या परीक्षार्थी यांची हॅण्डहेल्ड मेटल डिटेक्टरव्दारे तपासणी करण्यात येणार आहे. परीक्षार्थी यांनी परीक्षा केंद्रावर परीक्षेच्या दिवशी दुपारी 1.30 वाजता उपस्थित राहवयाचे आहे. तसेच दुपारी 3.00 वाजेनंतर परीक्षा केंद्राचे मुख्य प्रवेशव्दार बंद करण्यात येणार असून त्यानंतर कोणत्याही परीक्षार्थी यांना परीक्षा केंद्रात प्रवेश मिळणार नाही यांची सर्व परीक्षार्थींनी नोंद घ्यावी.
परीक्षेचे हॉलटिकीट परीक्षार्थी यांना उपलब्ध करुन देणेबाबत कळविण्यात आले असून त्यावर परीक्षार्थी यांना परीक्षेच्या दृष्टीने आवश्यक त्या सूचना नमूद केल्या आहेत. सर्व परीक्षार्थी यांनी परीक्षेस येतांना ओळखीबाबतचा प्रवेशपत्रात नमूद एक पुरावा सोबत बाळगणे आवश्यक आहे. त्याशिवाय परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार नाही, याबाबत दक्षता घेण्यात यावी. सदर परीक्षेची प्राथमिक उत्तरतालिका त्याच दिवशी सध्यांकाळी 6.00 वाजता https://jalna.gov.in/Jalna.nic.in या जिल्हा संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. परीक्षार्थी यांना दुस-या दिवशी सायंकाळी 6.00 वाजेपर्यंत संबंधित तहसिल कार्यालयात त्यावर आक्षेप सादर करता येईल. इतर ठिकाणी दाखल करण्यात आलेल्या आक्षेपांचा व तसेच मुदतीनंतर प्राप्त झालेल्या आक्षेपांचा विचार करण्यात येणार नाही. सदर परीक्षेची गुणवत्ता यादी दिनांक 7 जुलै 2024 रोजी निकाल प्रक्रिया पूर्ण होताच जाहिर करण्यात येईल याबाबत सर्व परीक्षार्थी यांनी नोंद घ्यावी, अशी माहिती अपर जिल्हाधिकारी रिता मेत्रेवार यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.