मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यास सामान्य ओबीसी जनतेचा कोणताही विरोध नसून, केवळ ओबीसी नेत्यांचा विरोध होत आहे. मराठा समाज ओबीसीत आला तर आपली दुकानदारी बंद होईल, अशी भीती या नेत्यांना असल्याची टीका मराठा मावळा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माणिकराव शिंदे यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केली.
शिंदे म्हणाले की, मराठा आरक्षणप्रश्नी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. तेव्हा मुख्यमंत्री शिंदे यांच्याशी चर्चा केली असून, आरक्षणासंदर्भातील सर्व घटकांना एकत्र आणून हा प्रश्न सोडविण्याची मागणी आपण मुख्यमंत्र्यांना केल्याचे पवार यांनी सांगितले. त्यामुळे लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याबाबत मागणी व पाठपुरावा करणार असल्याचे माणिकराव शिंदे म्हणाले. विधानसभा निवडणुकीपूर्वी आरक्षण न मिळाल्यास निवडणुकीत गनिमी काव्याने काम करुन सत्ताधारी व विरोधक अशा सर्व प्रस्थापितांना जमिनीवर आणल्याशिवाय मराठा मावळा संघटना स्वस्थ बसणार नसल्याचा सज्जड इशारा शिंदे यांनी यावेळी दिला. त्याचप्रमाणे मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करुन वेळप्रसंगी उमेदवार देण्याबाबतचा निर्णय घेतला जाईल, अशी भूमिका माणिकराव शिंदे यांनी मांडली. पत्रकार परिषदेस प्रदेश अध्यक्ष हनुमंत कदम पाटील, मराठवाडा अध्यक्ष पंढरीनाथ गोडसे पाटील, शहरजिल्हाध्यक्ष भरत कदम पाटील, मनोज गायकवाड पाटील, जालना जिल्हाध्यक्ष दत्ता चव्हाण पाटील, जालना युवक जिल्हाध्यक्ष अॅड. नितीन म्हस्के, राहुल मिसाळ, विवेक जाधव, निखिल म्हस्के, शुभम म्हस्के, तुषार म्हस्के यासह पदाधिकारी उपस्थित होते.
————————————————————
मुलांच्या वसतीगृह उभारण्यासाठी मागणी करणार
जालना शहरात ग्रामीण भागातून येणार्या गरीब व होतकरु विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह सुरु करावे, अशी मागणी जिल्ह्यातील सर्व बाजार समित्या आणि सहकारी साखर कारखान्यांच्या व्यवस्थापनाकडे करणार आहे. जालना बाजार समितीकडे यापूर्वीच मागणी केली होती. याचा पाठपुरावा करणार असल्याचे माणिकराव शिंदे यांनी सांगितले.