लोकसेवा हक्क कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी – जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ

जालना/प्रतिनिधी,दि.28
महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 हा नागरिकांना सेवेचा हक्क देणारा महत्वाचा कायदा आहे. या कायद्यान्वये नागरिकांना पारदर्शक, गतिमान व कालबद्ध सेवा मिळण्याचा अधिकार प्राप्त झाला आहे. या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी आज येथे केले.
येथील जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित सेवा हक्क दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी जिल्ह्यामधील लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था, पत्रकार, नागरीक जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी तसेच अधिकारी व अधिनस्त कार्यालये आदी यावेळी उपस्थित होते. तसेच यावेळी सेवेच्या बांधिलकी मानणारी शपथ घेण्यात आली.
यावेळी डॉ. पांचाळ मार्गदर्शन करतांना म्हणाले की, सेवा हक्क कायदा संपूर्ण राज्यात सर्व शासकीय सेवा देणाऱ्या विभागांसाठी लागू करण्यात आला आहे. या कायद्यामुळे नागरिकांना विहित कालमर्यादेत शासकीय विभागांच्या अधिसूचित सेवा मिळविण्याचा अधिकारी प्राप्त झालेला आहे. त्यामुळे शासकीय विभागाच्या अधिसूचीत सेवा विहित कालमर्यादेत नागरिकांना पुरविणे बंधनकारक आहे. शासनाच्या विविध योजना व सेवांचा लाभ नागरिकांना सुलभरित्या व तत्परतेने घेता यावा, यासाठी आपल्या विभागांतर्गत येणाऱ्या अधिकतम सेवा अधिसूचित करण्यासोबतच कायद्याच्या जनजागृतीसाठी विभागप्रमुखांनी प्रयत्न करणे आवश्क आहे. तसेच कायद्याची योग्य अंमलबजावणी देखील करणे आवश्यक आहे. या कायद्याची अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयोगाची स्थापना करण्यात आली असल्याचे देखील डॉ. पांचाळ यावेळी म्हणाले.
यावेळी कार्यक्रमास जिल्ह्यातील विविध विभाग प्रमुख यांच्यासह अधिकारी कर्मचारी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती..
नागरीकांना जलद गतीने सेवा देणाऱ्या नायब तहसीलदार मंगेश साबळे,तहसील कार्यालय जाफ्राबादाचे नायब तहसीलदार राजु निहाळ, तहसिल कार्यालय जालन्याचे नायब तहसीलदार कृष्णा फुलमाळी, अनुराधा नागोरी यांचा तसेच खुली निबंध स्पर्धेतील प्रथम,द्वितीय व तृतीय पारितोषिक आणि प्रशस्तीपत्र अविनाश जगताप व आसेफ पठाण , ओंकार घाटुळे यांचा जिल्हाधिकारी यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.