अंमली पदार्थाची विक्री, वाहतूक, वापर अथवा साठवणूक केल्याचे आढळल्यास पोलीस विभागाला माहिती द्यावी – निवासी उपजिल्हाधिकारी सोहम वायाळ

जालना/प्रतिनिधी,दि.25
अंमली पदार्थ शरीरास अत्यंत घातक आहेत. विशेषत: तरुण पिढीला अंमली पदार्थांच्या व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाने जिल्ह्यात अंमली पदार्थांच्या विरोधात धडक मोहिम सुरु करावी. आपल्या परिसरात अंमली पदार्थाची विक्री, वाहतूक, वापर अथवा साठवणूक केल्याचे आढळल्यास किंवा गांजाची लागवड केल्याचे निदर्शनास आल्यास सुजान नागरिकांनी पोलीस विभागाला माहिती द्यावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी सोहम वायाळ यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात अंमली पदार्थाच्या वापराला आळा घालण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस यावेळी राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक पराग नवलकर, अन्न व औषध प्रशासन, पोलिस, आरोग्य, टपाल, महसूल आदि विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
निवासी उपजिल्हाधिकारी श्री.वायाळ म्हणाले की, खाजगी कुरिअर सेवा, खाजगी ट्रॅव्हल्स यांच्यामार्फत अंमली पदार्थांची चोरटी वाहतूक होण्याची शक्यता असल्याने त्यांची अचानक तपासणी करावी. औषध विक्रेत्यांनी गुंगीकारक औषधांची डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय अजिबात विक्री करु नये. तसेच अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मेडीकल दुकानावरील गुंगीकारक औषधांचा साठा वेळोवेळी तपासून तो अधिकृतरित्या नियमाप्रमाणे खरेदी केला आहे का? तसेच अधिकृत वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्याप्रमाणेच याची विक्री होते का?, याची काटेकोर तपासणी करावी. अशा सुचनाही त्यांनी यावेळी केल्या. तसेच जिल्ह्यातील जनतेला शहरासह इतरत्र अंमली पदार्थ, नशेच्या पदार्थांची विक्री होत असल्याचे दिसून येताच त्यांनी पोलिस प्रशासनाला दुरध्वनी क्र. 02482-225100 किंवा ई-मेल sp.jalna@mahapolice.gov.in वर माहिती द्यावी, आपले नाव गोपनीय ठेवण्यात येईल. असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.