नितीन देसाईंच्या यांचे अचानक निघून जाणे चटका लावणारे – उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई/प्रतिनिधी, दि. 2
कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांच्या आत्महत्येचे वृत्त ऐकून धक्का बसला. त्यांचे अचानक निघून जाणे मनाला चटका लावणारे आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी श्रद्धांजली वाहिली.
उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी म्हटले आहे की, “कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांच्या आत्महत्येचे वृत्त ऐकून धक्का बसला. महाराष्ट्राच्या कला, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील अनेकांशी निकटचे, मित्रत्वाचे संबंध असलेल्या नितीन देसाईंचं अशा पद्धतीनं निघून जाणे अनाकलनीय, अविश्वसनीय, मनाला चटका लावणारे आहे. नितीन देसाई कलादिग्दर्शनाच्या क्षेत्रात सर्वोच्चस्थानी होते.
कलादिग्दर्शक असण्याबरोबरच निर्माता, दिग्दर्शक, अभिनेते म्हणूनही त्यांनी कर्तृत्वाचा ठसा उमटवला होता. ‘1942 अ लव्ह स्टोरी’, ‘हम दिल दे चुके सनम’, ‘माचिस’, ‘देवदास’, ‘लगान’, ‘जोधा अकबर’ यांसारख्या सुपरहिट सिनेमाचे कला दिग्दर्शन केले. चारवेळा सर्वोत्कृष्ट कलादिग्दर्शनासाठीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळवला. जागतिक दर्जाच्या एनडी स्टुडीओ निर्मितीतून सौंदर्यदृष्टीचे, कलागुणांचे, ध्येयवेडाचे दर्शन घडवले. हिन्दी चित्रपटसृष्टी आणि कलेच्या क्षेत्रात नितीन देसाईंसारखा मराठी तरुण आपले स्वतंत्र स्थान निर्माण करुन आहे, याचा महाराष्ट्राला अभिमान होता.
महाराष्ट्र शासनाच्या प्रत्येक उपक्रमाला त्यांचे मनापासूनच सहकार्य असायचे. महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या सुवर्ण महोत्सवाच्या आयोजनात त्यांनी सर्वस्व झोकून काम केले. प्रजासत्ताकदिनी कर्तव्यपथावर होणाऱ्या संचालनात महाराष्ट्राचा चित्ररथ तयार करण्यात त्यांची नेहमीच मदत व्हायची. हिन्दी चित्रपटसृष्टीसारख्या झगमगाटात राहूनही त्यांचे वागणे साधे, विनम्र होते. त्यांच्या निधनाने भारतीय कलासृष्टीचे, महाराष्ट्राचे मोठे नुकसान झाले आहे. मी नितीन देसाईंच्या कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी असून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, अशा शब्दात उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी नितीन देसाई यांच्या मृत्यूबद्दल दु:ख व्यक्त करुन श्रद्धांजली वाहिली आहे.