pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

दिबांच्या जन्मगाव जासईत पुन्हा सत्ता स्थापनेसाठी इंडिया महाआघाडीचे प्रयत्न ; भाजपचे मात्र एकला चलो रे !

0 1 7 4 0 5

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.3

लोकनेते दिवंगत दिबांचे जन्मगाव असलेल्या आणि वार्षिक पावणे दोन कोटी आर्थिक उत्पन्न असलेल्या जासई ग्रामपंचायतींवर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी इंडिया महाआघाडीने कंबर कसली आहे. आणि स्वबळावर लढणाऱ्या नवख्या भाजपच्या उमेदवारांनी इंडिया महाआघाडीला निवडणुकीत आव्हान दिले आहे.मात्र नवख्या उमेदवारांवर मतदार कितपत विश्वास टाकतात यावरच भाजपचे निवडणुकीतील भविष्य अवलंबून आहे.

लोकनेते दिवंगत दिबांच्या जन्मगावाबरोबर १९८४ साली देशभर गाजलेल्या ऐतिहासिक शेतकरी आंदोलनाचेही जासई प्रमुख केंद्र म्हणून ओळखले जाते.संघर्षाचा इतिहास असलेल्या जासई ग्रामपंचायतीमध्ये कॉंग्रेसचा एक अपवाद वगळता दिबांच्या पाठीराख्यांनी शेकाप व्यतिरिक्त अन्य कोणत्याही राजकीय पक्षांकडे पंचायतीची सत्ता जाऊ दिलेली नाही.जासई ग्रामपंचायतीची लोकसंख्या १२ हजारांहून अधिक आहे.ग्रामपंचायत हद्दीतील विविध कंटेनर यार्ड, कंपन्यांमुळे ग्रामपंचायतीचे वार्षिक आर्थिक उत्पन्न पावणे दोन कोटीच्या घरात आहे.तसेच विविध आंदोलनांचे केंद्र म्हणूनही जासईची ओळख आहे.त्यामुळे वर्चस्वासाठी ग्रामपंचायतीवर आपल्याच पक्षाचे वर्चस्व असावे ही प्रबळ इच्छा सर्वच राजकीय पक्षात असणे स्वाभाविकच आहे.

मात्र मागील अनेक वर्षांपासून दिबांचे गाव म्हणून नावारूपास आलेल्या जासई ग्रामपंचायतीवर कॉंग्रेसचा एखादा अपवाद वगळता कायम शेकापचेच वर्चस्व राहिले आहे.या निवडणूकीत मात् भाजपने पुन्हा एकदा उडी घेतली आहे.मात्र मागील निवडणुकीपासून सलग सात वर्षे सरपंच व ग्रामपंचायतीचा धुरा सांभाळणाऱ्या आणि सरपंच पदासाठी प्रबळ दावेदार म्हणून ओळखले जाणाऱ्या संतोष घरत हे सेना, शेकाप, कॉंग्रेस, राष्ट्रवादी आदी पक्ष्यांच्या महाआघाडीने भाजपला निवडणूकीत चारमुंड्या चीत करण्याची जोरदार तयारी सुरू केली आहे.त्यातच नवीमुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव देण्यासाठी भाजपप्रणीत केंद्र,राज्य सरकारने चालविलेल्या दिरंगाईमुळे जासईतील मतदारात मोठी नाराजी आहे.

जासई ग्रामपंचायतीमध्ये सहा प्रभाग आहेत.या सहा
प्रभागातून थेट सरपंच पदासह १६ सदस्यपदासाठी ५ नोव्हेंबर रोजी निवडणूक होत आहे.थेट सरपंचाच्या एका जागेसाठी तीन उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात उतरले आहेत.यामुळे सरपंचपदासाठी तिरंगी लढत होत आहे.तर प्रभाग क्रमांक तीनमधुन इंडिया महाआघाडीच्या सृष्टी म्हात्रे यांची याआधीच बिनविरोध निवड झाली आहे.त्यामुळे उर्वरित १६ सदस्यपदासाठी ३४ उमेदवार निवडणूक लढवित असल्याने महाआघाडी विरोधात भाजप अशी सरळ लढत होणार आहे.या मतदार संघात ४१८२ मतदार आहेत.

मागील निवडणुकीत स्थबळावर शेकापने निवडणूक लढविली होती.थेट सरपंचपदी झालेल्या निवडणुकीत संतोष घरत विजयी झाले होते.तसेच शेकापने सत्ताही काबीज केली होती.या निवडणुकीतही सरपंचपदासाठी इंडिया महाआघाडीचे अनुभवी संतोष घरत यांना उमेदवारी दिली आहे.त्यामुळे भाजपचे नवखे बळीराम घरत यांच्यातच थेट लढत होणार आहे.महाआघाडीचे शिवसेनेचे बबनदादा पाटील, जिल्हाप्रमुख माजी आमदार मनोहर भोईर, कॉंग्रेस कमिटीचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेंद्र घरत, तालुका अध्यक्ष विनोद म्हात्रे, शेकापचे ज्येष्ठ आमदार जयंत पाटील, माजी आमदार बाळाराम पाटील, उद्योजक जे.एम.म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रचार सुरू आहे.

तर भाजपतर्फे माजी खासदार रामशेठ ठाकूर, आमदार महेश बालदी, आमदार प्रशांत ठाकूर यांनी प्रचाराचा धुरा सांभाळली आहे. विकासाच्या बळावर सरपंचपदासह सदस्यपदाच्या १७ जागांवर महाआघाडीचे सर्व उमेदवार मोठ्या फरकाने निवडून येतील असा विश्वास महाआघाडीचे संतोष घरत यांनी व्यक्त केला आहे.तर विरोधकांवर टीका करताना जासईचा विकास करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येतील.तसेच सरपंचासह किमान १० सदस्य विजयी होऊन ग्रामपंचायतीवर सत्ता स्थापन करु असा दावा भाजपचे सरपंचपदाचे उमेदवार बळीराम घरत यांनी केला आहे.या निवडणुकीत कोण बाजी मारतो हे पाहने आता महत्वाचे ठरेल.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 0 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे