उरण तालुका अपघात निवारण समितीने केलेल्या मागणीवर प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद.
बैठकीत महत्वाच्या मुद्द्यावर झाली चर्चा. घेण्यात आले अनेक महत्वाचे निर्णय

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.30
दि २९ एप्रिल २०२५ रोजी उरण तालुक्यातील रस्ते अपघात, वाहतूक कोंडी, महामार्ग आणि सर्विस रोडवरील अवैध पार्किंग, शहरातील वाहतूक कोंडी, इ. विषयांवर ऑफिसर्स क्लब, जेएनपीटी टावूनशिप उरण येथे नियोजित बैठक पार पडली. या बैठकिला वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त तिरूपती काकडे, सहाय्यक पोलीस आयुक्त विठ्ठल कुबडे, तिन्ही युनिटचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक, तसेच सिडको,जेएनपीए,एनएचआयए,नगरपालिका आणि सिएफएस, एमटी गोडाऊन, ट्रान्स्पोर्ट यांचे प्रतिनिधी आणि पत्रकार उपस्थित होते. जेनपीएचे विश्वस्त दिनेश पाटील यांनी सुरूवातीला अधिकारी व उपस्थितांचे स्वागत करून बैठकीचे प्रयोजन सांगितले व समितीचे निवेदन सादर केले. त्यानंतर उरण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुधाकर पाटील यांनी आपल्या प्रास्ताविकात तालुक्यातील भिषण अपघात, वाहतूक कोंडी, सर्वीस रोड आणि महामार्गावर होणारी अवैध पार्किंग इ.बाबत उहापोह केला. त्यानंतर उरण तालुका अपघात निवारण समितीने दिलेल्या एकूण १५ मुद्द्यांवर पोलीस उपायुक्त तिरूपती काकडे यांनी सर्व संबंधितांना आपापल्या स्तरावर उचित कारवाई करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यात सर्विस रोड किंवा महामार्गावर थांबणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करणे, सिफएस मालकांनी आपली वाहने रस्त्यावर न पार्किंग करता कंपनी गेटच्या आतमध्ये घेणे,रस्त्यावरील खड्डे त्वरीत दुरूस्त करणे, सूचना फलक अद्ययावत करणे, रस्त्यावरील धुळ साफ करणे, सर्व अधिकाऱ्यांनी समन्वय साधणे इ. चा समावेश आहे. तसेच प्रत्येक महिन्याला कारवाईचा आढावा घेण्यात येणार आहे.असे महत्वाचे निर्णय या बैठकीत झाले.शेवटी रवी पाटील, विश्वस्त जेएनपीए यांनी उपस्थितांचे आभार मानले.