मोर्शी-अमरावती महामार्गावर भीषण अपघात:लग्नाचा बस्ता खरेदी करून परतताना कार-क्रेनमध्ये धडक; 3 जणांचा मृत्यू, तिघे जखमी

मोर्शी/त्रिफुल ढेवले,दि.8
मोर्शी-अमरावती महामार्गावर सावरखेडजवळ हायड्रा क्रेन आणि अल्टो कारच्या धडकेत तीन जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये नुकताच विवाहबद्ध झालेला निलेश गव्हाळे २८, लग्नाच्या उंबरठ्यावर असलेला वैभव खासदेव २६ आणि त्याची आई गीता खासदेव ५२ यांचा समावेश आहे.वैभवच्या लग्नासाठी बस्ता खरेदी करून अमरावतीहून परतताना सायंकाळी हा अपघात झाला. कार चालवत असलेला निलेश घटनास्थळीच ठार झाला. गीता खासदेव यांना रुग्णालयात नेल्यानंतर मृत घोषित करण्यात आले. वैभवचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.अपघातात नीताशा गव्हाळे २८, मीना खोसे ३१ आणि दिलीप कडोकार ५० हे तीन जण गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर अमरावतीच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.मृत व्यक्ती मध्य प्रदेशातील बिसनूरच्या रहिवासी होत्या. निलेशचे लग्न ३० एप्रिलला झाले होते. वैभवचे लग्न २६ मेला होणार होते. सीमेवरील रहिवासी असल्याने ते नेहमीच मोठ्या खरेदीसाठी अमरावतीला येत असत.शिरखेड पोलीस ठाण्याचे ठाणेदार सचिन लुले यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. क्रेन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.