दैनंदिन व्यवहारासाठी डिजिटल व्यवहाराचा मोठ्या प्रमाणात वापर जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ

जालना/प्रतिनिधी,दि.24
डिजिटल व्यवहार हा आता आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग झाला असुन त्याचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. डिजिटल तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे सर्व प्रकारचे व्यवहार सोपे झाले असतानाच याच तंत्रज्ञानाचा वापर करून ग्राहकांच्या फसवणुकीचे प्रकारही वाढले असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ म्हणाले.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवन येथे राष्ट्रीय ग्राहक दिनाचे आयोजन करण्यात आले होते, त्याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ बोलत होते. यावेळी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या अध्यक्ष श्रीमती अपर्णा काटे, वरिष्ठ न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या सचिव श्रीमती प्रणिता भारसाकडे-वाघ, जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती सविता चौधर, तहसिलदार श्रीमती छाया पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी डॉ. पांचाळ पुढे म्हणाले की, आजचे युग हे डिजिटल युग असुन, वेळेची आणि पैशाची बचत करण्यासाठी प्रत्येक जण आज डिजिटल व्यवहाराचा मोठ्या प्रमाणात वापर करत आहेत. परंतू डिजिटल व्यवहार करतांना फसवणूकीचे प्रकार वाढल्याने प्रत्येकाने सतर्क राहणे देखील आवश्यक आहे. ऑनलाईन किंवा डिजिटल व्यवहार करतांना अनोळखी लिंक किंवा ओटीपी बाबत सावध भूमिका घेणे आवश्यक आहे. तसेच फसवणूक झाल्यास ऑनलाईन तक्रार देखील नोंदविणे आवश्यक आहे. तसेच ग्राहकांना सुरक्षित डिजिटल व्यवहाराबद्दल जागरूकता देखील निर्माण करणे आवश्यक आहे.
श्रीमती अपर्णा काटे म्हणाल्या की, न्यायालयात लवकरच व्हर्च्युअल आभासी सुनावणी आणि ग्राहक न्यायासाठी डिजिटल सुविधा सुरु होणार आहे. यामुळे नागरिकांचा वेळ आणि पैसे या दोन्हीची बचत होणार आहे. व्हर्च्युअल सुनावणी सुरु होणार असल्याने नागरिकांमध्ये जनजागृती करणे आवश्यक आहे. ज्यामुळे या सुविधांचा सर्वांना वापर करणे सोयीचे होईल.
जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती सविता चौधर प्रास्ताविकात म्हणाल्या की, 24 डिसेंबर, 1986 या दिवशी ग्राहक हक्क कायद्याला मंजुरी मिळाल्याने दरवर्षी 24 डिसेंबर हा दिवस ‘राष्ट्रीय ग्राहक दिन’ म्हणुन साजरा केला जातो. ग्राहक संरक्षण कायद्यामुळे प्रत्येक भारतीय ग्राहकाला हक्क प्राप्त झालेले आहेत.
यावेळी कार्यक्रमास जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे सदस्य आणि नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.