महाराष्ट्र शासन तर्फे महावितरण जागेचा करार संपन्न.
दिघोडे विद्युत उपकेंद्रसाठी जमीन हस्तांतरीत. जमिन महावितरणला वर्ग झाल्याने जमिनीचे झाले रजिस्ट्रेशन. जिल्हा परिषद सदस्य कुंदा ठाकूर, माजी जिल्हा परिषद सदस्य वैजनाथ ठाकूर यांच्या पाठवपुराव्याला आले यश.

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.5
उरण तालुक्यातील पूर्व भागातील सातत्याने खंडीत होणार्या विज पुरवठ्यावर उपाय म्हणून एक नवीन विद्युत उपकेंद्र उभारावे अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य कुंदा ठाकूर,माजी जिल्हा परिषद सदस्य वैजनाथ ठाकूर यांनी मंत्री आदिती तटकरे आणि रायगडचे खासदार सुनील तटकरे यांची भेट घेवून केली होती . या साठी ते गेले चार वर्ष सातत्याने ते शासन दरबारी पाठपुरावा करत आहेत.
या उपकेंद्राकरीता दिघोडे येथील प्रस्तावित आरोग्य केंद्रा जवळील शासकीय जागा वैजनाथ ठाकूर यांनी शासनाच्या निदर्शनास आणून दिली होती आणि त्या जागेवर उपकेंद्र बांधावे असे सुचविले होते. अदिती तटकरे पालक मंत्री असताना त्यांनी याबाबत हि जागा महावितरणला हस्तांतरीत करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले होते. मात्र त्यावर अद्यापही कारवाई होत नसल्याबद्दल हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावा अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य कुंदा ठाकूर, माजी जिल्हा परिषद सदस्य वैजनाथ ठाकूर यांनी खासदार सुनील तटकरे, मंत्री आदितीताई तटकरे यांच्याकडे सातत्याने लावून धरली होती.आता कुंदा ठाकूर व वैजनाथ ठाकूर यांच्या ४ वर्षाच्या मेहनतीला फळ आले असून सतत केलेल्या पाठपुराव्याला आता यश आले आहे. महाराष्ट्र शासनाच्या नोंदणी व मुद्रांक विभाग, दुय्यम निबंधक श्रेणी -१,उरण (सब रजिस्टर ऑफिस )येथे जमिनीचा करार संपन्न झाला. सदर जमिनीचे रजिस्ट्रेशन झाले यावेळी शासनाचे प्रतिनिधी म्हणून तहसीलदार उद्धव कदम, पनवेल शहर विभाग कार्यकारी अभियंता सतीश सरोदे, उरण विभागाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता संदीप चाटे, जासई शाखेचे सहाय्यक अभियंता विजयकुमार मिश्रा,तसेच सामाजिक कार्यकर्ता आस्मक पाटील,रोहन मढवी ( नोंदणी व मुद्रांक विभाग सहकारी मित्र),तसेच रजिस्टर ऑफिसचे अधिकारी तसेच जिल्हा परिषद सदस्य कुंदा ठाकूर, माजी जिल्हा परिषद सदस्य वैजनाथ ठाकूर उपस्थित होते.या कामी सहकार्य केलेल्या खासदार सुनील तटकरे, मंत्री आदितीताई तटकरे,या कामाला सहकार्य करणारे सर्वच मान्यवर, ग्रामस्थांचे, शासकीय अधिकारी, मध्य व पूर्व विभाग मित्र परिवाराचे कुंदा ठाकूर व वैजनाथ ठाकूर यांनी आभार मानले आहेत.
उरण तालुक्यातील पूर्वविभागाला वीज पुरवठा करणाऱ्या विद्युत वाहिनीचे सबस्टेशनपासून अंतर ४० ते ४५ किलोमिटर एवढे प्रचंड आहे आणि या वीज वाहिन्या खाडीतील चिखल, दलदल आणि झाडा झुडपातून येत आहेत.त्याच बरोबर त्या ४८ वर्ष जून्या असल्यामुळे रोज तारा तुटून किंवा शॉर्ट सर्किट होवून वीज प्रवाह खंडित होतो. त्यावर उपाय म्हणज उरण पूर्व भागासाठी नवीन सबस्टेशन उभारले पाहिजे असे महावितरणच्या अधिकाऱ्यांचे देखील मत आहे. त्यासाठी कुंदा ठाकूर व वैजनाथ ठाकूर हे सातत्याने प्रयत्नशील होते.
महावितरणने देखिल यासाठी दिघोडे येथिल सर्व्हे क्र. ११६ (६) क येथील जागा महावितरणला हस्तांतरीत करावी असा प्रस्ताव तहसिल कार्यालयाकडे दिलेला होता.दरम्यान, उपकेंद्रांला लवकर जागा हस्तांतरीत करण्याची मागणी कुंदा ठाकूर,वैजनाथ ठाकूर यांनी केलेली होती त्या अनुषंगाने या सदर जमिनीचे रजिस्ट्रेशन करण्यात आले असून सदर जमीन महावितरण कंपनीकडे वर्ग करण्यात आला आहे.दिघोडे उपकेंद्र अंतर्गत सर्वत्र अंडर केबल बसविण्यात यावी. अंडर केबल साठी जास्त निधीची तरतूद करण्यात यावी अशी मागणी कुंदा ठाकूर, वैजनाथ ठाकूर यांनी प्रशासनाकडे केली आहे. लवकरच अंडर केबलच्या विषया संदर्भात कुंदा ठाकूर व वैजनाथ ठाकूर हे ऊर्जा मंत्री मा. ना. देवेंद्र फडणवीस यांची लवकरच भेट घेणार आहेत.