दु:खाशी दोन हात करतांना-कसरतीचे बळ.

टेंभुर्णी/ सुनिल भाले,दि.19
टेंभुर्णी. शहरातील नवभारत शिक्षण संस्थेच्या श्रीमती.जे.बी.के विद्यालय व नवभारत उच्च माध्यमिक विद्यालयात,आज “शाब्बास इंडिया कलाकार संघाच्या” वतीने कसरतदार सय्यद साजन, सय्यद समिर, सय्यद अस्लम, सय्यद रज्जाक, अल्ताफ सय्यद, या कलाकारांनी श्रीमती. जे.बी.के.विद्यालयाच्या प्रांगणात चित्तथरारक कसरती करून उपस्थित विद्यार्थ्यांची मने जिंकली, शाब्बास इंडियाच्या कलाकारांनी कसरतीचे विविध प्रकार करून दाखविले, त्यात-छातीवर पन्नास- साठ किलो चा दगड फोडून दाखविला, तेंव्हा उपस्थित विद्यार्थ्यांची मने हेलावली, तर डोक्याच्या केसांना सायकली बांधून, फिरविणे, लाकडी घोड्यावर चालने,मोठी चार चाकी गाडी डोक्याच्या केसांना बांधून ओढणे,तिस- चाळीस किलोचा दगड, दाताने उचलून पाठीमागे लिलया फेकने, हाताने दगड फोडून दाखविणे,या सारख्या चित्तथरारक,मन हेलावून टाकणा-या कसरती करून उपस्थितांची मने जिंकली, शाब्बास इंडियाचे कलाकार सय्यद साजन यांना विचारले असता त्यांनी सांगितले की सध्या पोटापाण्याचा प्रश्न बिकट झाला आहे, आम्हाला आमच्या कौटुंबिक गरजा भागविण्यासाठी या वंशपरंपरागत कलेचा आधार घ्यावा लागतो, या कलेच्या बळावर आम्हाला जगण्यासाठी संघर्ष करावा लागतो आहे, तेंव्हा आपसूकच मनात अनेक प्रश्नांचे काहूर माजते, एकीकडे जगातील दहा श्रीमंतांच्या यादीत काही भारतीयांचा समावेश आहे, अवकाशात चांद्रयान पाठविणारा भारत, मेट्रो, बुलेट ट्रेन ची भुरळ पडलेला भारत, विज्ञान तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात प्रचंड प्रगती करणारा भारत, एकीकडे भारतीय समाजाची झालेली प्रगती बघुन अभिमानाने ऊर भरून येतो, तर दुसरीकडे भारतीय समाज व्यवस्थेतील जगण्यासाठी जीवावर बेतेल असे धाडसी खेळ करून काही समाज घटक उदरनिर्वाहासाठी धडपडत आहेत,त्यांची धडपड पाहून, मनात हुरहूर निर्माण होते, शिक्षणापासून, प्रगती पासुन, भौतिक सुविधांपासून आजही भारतीय समाजातील काही घटक -कोसो दूर आहे, लोककला जोपासणारे कलाकार, तमाशा कलावंत, पारंपारिक खेळ करणारे दरवेशी, बहुरूपी, पिंगळा,गारूडी, या सारख्या कला जोपासणा-या कलाकारांची परवड बघीतली की,वाटते श्रीमंतांची वस्ती असलेल्या गरीबांच्या या देशात, गरिबी निर्मूलनासाठी शासन, प्रशासन,समाज यांनी काही ठोस निर्णायक भूमिका घेणे गरजेचे आहे.जेणे करून भारतीय समाज व्यवस्थेतील दुर्बल घटकाचा विकास होईल, आज प्रशालेच्या वतीने शाब्बास इंडियाच्या कलाकारांना, श्रीमती. जे.बी.के. विद्यालय व नवभारत उच्च माध्यमिक विद्यालयाच्या वतीने प्राचार्य भास्कर चेके सर यांच्या हस्ते ४०००रू. ची आर्थिक मदत देण्यात आली, शाब्बास इंडियाचे कलाकार पुढील कसरतीचे खेळ करण्यासाठी पुढील गावी निघून गेले,मात्र मागे अनेक -विचार, प्रश्न, समस्या सोडुन गेले.