दोन अवैध महिला सावकारांवर सहकार विभागाने टाकली धाड स्टॅम्प पेपरसह अन्य दस्ताऐवज जप्त मोर्शी येथे कारवाई

मोर्शी/प्रतिनिधि,दि.13
मोर्शी : मोर्शी शहरालगत दोन महिला स्वतंत्ररित्या अवैध सावकारी करत असल्याची तक्रार सहकार विभागाकडे प्राप्त झाली होती. या माहितीच्या आधारे सहकार विभागाच्या दोन पथकांनी शनिवारी एकाचवेळी धाड टाकून या दोन्ही महिलांच्या ताब्यातील स्टॅम्प पेपर व अन्य दस्तावेज जप्त केले. या प्रकरणात सहकार विभागाने चौकशी सुरू केली आहे. अवैध महिला सावकारांवर जिल्ह्यात अलीकडे झालेली ही पहिलीच कारवाई आहे.काही दिवसांपूर्वीच मोर्शी सहायक निबंधक कार्यालयात एका तक्रारदाराने मोर्शीत दोन महिला अवैध सावकारी करत असल्याची तक्रार दिली. त्या तक्रारीच्या आधारे सहकार विभागाने दोन पथके तयार केली. या दोन्ही महिला मोर्शी येथे अप्पर वर्धा विभागाच्या वापरात नसलेल्या शासकीय वसाहतीतून अवैध सावकारी करत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पथकाने एकाच वेळी दोन्ही महिलांकडे धाड टाकली. त्यावेळी दोन्ही ठिकाणांहून पथकाला अवैध सावकारी संबंधित स्टॅम्पपेपर व इतर महत्त्वाचे दस्तावेज मिळून आले. सहकार विभागाच्या पथकाने ते जप्त केले आहेत. ही कारवाई जिल्हा उपनिबंधक शंकर कुंभार यांच्या मार्गदर्शनात पथक प्रमुख स्वाती गुडधे, पथक प्रमुख प्रीती धामणे, सुधीर मानकर, प्रदीप देशमुख, अविनाश महल्ले यांच्यासह सहकार विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी केली. लेखीपेक्षा तोंडी व्यवहार जास्त या दोन्ही महिला मागील काही महिन्यांपासून अवैध सावकारी करत आहेत. त्यांनी लेखी व्यवहारापेक्षा तोंडी व्यवहारच अधिक केल्याची माहिती सहकार विभागाला प्रथमदर्शनी मिळाली असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.महिला अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात कारवाईसाठी नेमले पथक तक्रारदाराने महिला अवैध सावकारी करत असल्याचे सांगितल्यानंतर जिल्हा उपनिबंधकांनी कारवाईसाठी महिला अधिकारी, कर्मचाऱ्यांचे स्वतंत्र पथक तयार केले. महिला अधिकाऱ्यांनीच पुढाकार घेऊन ही कारवाई यशस्वी केली. या वेळी पुरुष अधिकारी, कर्मचारी त्यांच्या मदतीसाठी होते मात्र नेतृत्व महिला अधिकाऱ्यांनीच केले.