जलव्यवस्थापन कृती पंधरवाड्याचा शुभारंभ

जालना/प्रतिनिधी,दि.15
जिल्ह्यातील जलसंपदा विभाग, महसूल विभाग, जिल्हा परिषद, कृषी विभाग, महानगर पालिका व इतर शासकीय यंत्रणांनी एकत्रित येऊन सिंचन विषयक अडचणी, सुधारणा व व्यवस्थापन याबाबत विविध प्रकारचे प्रशिक्षण, व्याख्याने, चर्चासत्र व इतर लोककलेची सांस्कृतिक कार्यक्रम घेऊन समाजामध्ये जनजागृती करण्याची मोहीम हाती घेतली. त्यानुसार आज दि. 15 एप्रिल 2025 पासून सुरु होणाऱ्या जलव्यवस्थापन कृती पंधरवाड्याचा शुभारंभ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जगदीश मिनियार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील पाच नद्यांचे जल असलेल्या कलशाचे पूजन करुन करण्यात आला.
जलसंपदा मंत्री श्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे संकल्पनेतील सिंचन, पाणीवापर, पीकपध्दती या विविध बाबींचे महत्व जनसामान्यांपर्यंत पोहचविण्याकरिता “जलव्यवस्थापन कृती पंधरवडा-2025” ची घोषणा करण्यात आली. यामध्ये राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये जलसंपदा प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात येणाऱ्या गावांमध्ये जलसाक्षरता करुन सिंचनाचे महत्व समाज बांधवांच्या मनावर रुजविण्याकरिता जिल्हानिहाय ‘पालक अभियंता’ यांची नेमणुक करण्यात आली. त्यानुसार जालना जिल्ह्यासाठी अधीक्षक अभियंता भारत शिंगाडे यांची पालक अभियंता म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
यामध्ये अधीक्षक अभियंता तथा पालक अभियंभारत शिंगाडे, अपर जिल्हाधिकारी रिता मैत्रेवार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गहिनीनाथ कापसे, कार्यकारी अभियंता रोहित देशमुख, सुरेखा कोरके आदिसह जिल्ह्यातील विविध शासकीय यंत्रणा, जलदूत, शेतकरी, स्वयंसेवी संघटना, यांनी सहभाग नोंदविला. जलव्यवस्थापन कृती पंधरवाड्यात 15 ते 30 एप्रिल दरम्यान होणाऱ्या कार्यक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी होण्याकरीता सर्वांनी जलप्रतिज्ञा घेतली. त्यानंतर उपस्थित मान्यवरांचे स्वागत करुन श्रीमती कोरके यांनी कृती पंधरवाडयाची रुपरेषा प्रस्तावित केली. व श्री. देशमुख यांनी जिल्ह्यातील विविध प्रकल्पांच्या सिंचन विषयक बाबी सादर केल्या. त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या भाषणासह योगेश माने यांनी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. असेही कळविण्यात आले आहे.