गोंधनखेडा आणि सावंगी गावातून मानव विकास मिशनची बस सुरू
गावकऱ्यांसह विद्यार्थिनींनी केले स्वागत

जाफराबाद/विशाल देशमुख,दि 4
गोंधनखेडा आणि सावंगी येथील सरपंच आणि ग्रामस्थांच्या अथक प्रयत्नांना यश आले असून दोन्ही गावातील मुलीसाठी मानव विकास मिशन ची बस सेवा आता गावातून सुरू झाली आहे. सावंगी आणि गोंधनखेडा येथील जवळपास दीडशेच्या वर मुली माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण घेण्यासाठी टेंभुर्णी येथे येत होत्या.जाफराबाद आगाराच्या बस दोन्ही गावात येत नसल्याने विद्यार्थिनींना फाट्यावरूनच बस मध्ये बसावे लागत असे. गोंधनखेडा खामखेडा गट ग्रामपंचायत चे सरपंच विठ्ठल गोरे आणि सावंगीचे सरपंच किशोर वरगणे यांनी गावातून बस सेवां सुरू न झाल्यास विद्यार्थिनी आणि ग्रामस्थांसह आंदोलन करण्याचा इशारा दिल्यानंतर जाफराबाद आगाराने मंगळवार ता. ३ पासून दोन्ही गावातून विद्यार्थिनींसाठी बस फेरी सुरू केली आहे.बस गावात आल्यावर दोन्ही गावातील ग्रामस्थांनी बसची आकर्षक सजावट करून चालक, वाहक यांचे स्वागत केले. गावातून फाट्यापर्यंत पायी जाण्याची पायपीट थांबल्यामुळे आणि शाळा सुटल्यावर गाडी थेट शाळेजवळून घरापर्यंत येत असल्याने सर्व विद्यार्थिनींनी देखील आनंद साजरा करत जाफराबाद आगाराचे आणि सरपंच विठ्ठल गोरे आणि किशोर वरगणे यांचे आभार मानले आहेत.

