अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर होणारे बालविवाह रोखण्यासाठी प्रशासनाकडून दक्षता

जालना/प्रतिनिधी, दि 16
अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर 19 एप्रिल रोजी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर विवाह सोहळे पार पडणार आहेत. मात्र, या मुहूर्ताचा गैरफायदा घेऊन बालविवाह उरकले जाण्याची शक्यता लक्षात घेता, जिल्हा प्रशासकीय यंत्रणा हायअलर्टवर आली आहे. जिल्हाधिकारी यांनी याबाबत सर्व संबंधित विभागांना सतर्कतेचे आदेश दिले असून, बालविवाहाचा प्रयत्न केल्यास कठोर कारवाईचा इशारा दिला आहे. बालविवाह रोखण्यासाठी जिल्हा, तालुका आणि गाव पातळीवर विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत. ग्रामीण भागात ग्रामसेवक, तर नागरी भागात बालविकास प्रकल्प अधिकारी हे बालविवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून चोवीस तास कार्यरत राहणार आहेत. जिल्हा महिला व बालविकास अधिकारी आर. व्ही. कड यांनी स्पष्ट केले की, बालविवाहाची तयारी सुरू असल्याची कुणकुण लागताच नागरिकांनी तत्काळ प्रशासनाला कळवावे. बालविवाह प्रतिबंधक अधिनियम 2006 नुसार, विवाहासाठी मुलीचे वय 18 वर्षे आणि मुलाचे वय 21 वर्षे पूर्ण असणे बंधनकारक आहे. यापेक्षा कमी वयात विवाह केल्यास दोन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा, 1 लाख रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षा एकाच वेळी होऊ शकतात. बालविवाहाची माहिती देणाऱ्या नागरिकांची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवली जाईल. चाईल्ड हेल्पलाईन 1098, पोलीस नियंत्रण कक्ष 112, इतर कार्यालये जवळचे पोलीस स्टेशन, ग्रामपंचायत, पंचायत समिती किंवा जिल्हा बालसंरक्षण कक्षाशी संपर्क साधावा. असे प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.



