उरण तालुक्यात NMMT च्या बसेस सुरु न झाल्यास भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) तर्फे आंदोलनाचा इशारा.

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.25
नवी मुंबई महानगर पालिकेच्या माध्यमातून एन.एम. एम. टी. च्या बसेस उरण ते कळंबोली, उरण ते कोपर खैरणे व जुईनगर ते वशेणी (बस मार्ग क्र. ३०, ३१ व ३४) धावणाऱ्या बसेस अचानक पणे दि. २२ फेब्रुवारी २०२४ पासून बंद करण्यात आलेले आहेत. त्यामुळे उरण तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागातील नोकरी, व्यवसाय, काम-धंदा, शिक्षण व कार्यालयीन कामानिमित्त दररोज नवी मुंबई कडे जाणाऱ्या येणाऱ्या हजारो प्रवाश्यांचे हाल होत आहेत व आर्थिक नुकसान होत आहे. दहावी व बारावीचे वार्षिक परीक्षा सुरु आहेत, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.प्रवाशांची सार्वजनिक सुविधा नवी मुंबई महानगर पालिकेने तसेच NMMT (नवी मुंबई मुन्सिपल ट्रान्सपोर्ट )ने कुठल्याही प्रकारची पूर्वसूचना न देता ही सेवा अचानक पणे बंद केलेली आहे ती तातडीने सुरु करावी अशी मागणी भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी )पक्षातर्फे नवी मुंबई महानगर पालिका व नवी मुंबई महानगर पालिकेच्या अंतर्गत सुरु असलेल्या परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांकडे केली आहे.नवी मुंबई महानगर पालिकेने व NMMT प्रशासनाने प्रवाशांसाठी अत्यंत महत्वाची असलेली ही सार्वजनिक सुविधा तातडीने सुरु केली नाही तर सोमवार दिनांक २६ फेब्रुवारी २०२४ रोजी उरण-चारफाटा येथे सी.आय.टी.यू., किसान सभा, जनवादी महिला संघटना, डी. वाय. एफ.आय. व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष रायगडच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात येईल व याची सर्वस्वी जबाबदारी नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त यांची राहील, याची योग्य ती नोंद घ्यावी असा इशारा भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी )तर्फे नवी मुंबई महानगर पालिका व एनएमएमटी प्रशासनाला पत्रव्यवहाराद्वारे देण्यात आला आहे.उरणच्या नागरिकांनी तसेच एनएमएमटीच्या बसने प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाश्यांनी या धरणे आंदोलनात मोठया संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन सी.आय.टी.यू, किसान सभा, जनवादी महिला संघटना, डी. वाय. एफ.आय व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष रायगडच्या वतीने करण्यात आले आहे.