फ्रेंड्स ऑफ नेचरने साजरा केला जागतिक चिमणी दिवस.

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.21
मानवी जीवनातील आणि मराठी कुटुंबातील अविभाज्य घटक असलेला इटूकला पक्षी म्हणजे “चिमणी”. नवजात बालकांच्या आंघोळीपासून ते बाळ मोठं होऊन स्वतःच्या हाताने जेवत नाही, तोपर्यंत हा प्रवास सोबतच सुरू असतो. शेतकरी दादाची मित्र असलेली ही चिमणी पिक नष्ट करणारे कीटक खाऊन पिकाचे रक्षण करते आणि मानव जातीला उपासमारीपासून वाचवते. सिमेंट काँक्रीटच्या जंगलात तिचं (चिऊताई चं) घरटं हरवलं आहे. वातावरणातील उष्णतेमुळे ह्या जीवांचे जगणे असह्य झाले आहे. पुढच्या पिढ्यांना चिऊताई फक्त गोष्टी रुपात पहायला मिळू नये, चिऊताईला कृत्रिम घरटं मिळावं, तिचं रक्षण व संवर्धन व्हावं म्हणून फ्रेंड्स ऑफ नेचर(फॉन)या संस्थे मार्फत विविध उपक्रम राबवून जागतिक चिमणी दिवस साजरा करण्यात आला.
जागतिक चिमणी दिवस २० मार्च रोजी साजरा केला जातो. रायगडमधील उरण तालुक्यातील फ्रेंड्स ऑफ नेचर (फॉन FON) या संस्थेने नुकतीच १८ वर्षे पूर्ण केली आहेत. जागतिक चिमणी दिवसाच्या निमित्ताने या संस्थेने दि.१६ मार्च २०२४ ते २० मार्च २०२४ या दरम्यान हा चिमणी दिवस आगळ्यावेगळ्या उपक्रमाने साजरा केला.
वेस्टमधून बेस्ट या संकल्पनेतून उरण पूर्व विभागातील रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोठी जुई, सारडे, खोपटे आणि चिरनेर अशा चार शाळांमध्ये तसेच वीर वाजेकर महाविद्यालय फुंडे-उरण येथील विद्यार्थ्यांकडून चिमणी घरटी बनविण्याची कार्यशाळा आयोजीत करण्यात आली होती. या उपक्रमातून जवळपास ३०० चिमणी घरट्यांची निर्मिती करण्यात आली आणि ही घरटी पुन्हा विद्यार्थी आणि शिक्षक यांना मोफत वाटप करण्यात आली. यावेळी सदर शाळा आणि कॉलेजमधील शिक्षकांचे मोलाचे सहकार्य लाभले.
या उपक्रमासाठी लागणारे वेस्ट बॅनर्सचे रोल (काही वेळेस टाकाऊ) हे श्री एकविरा प्रिंटर्स उरण यांच्याकडून मिळाले. तसेच पाच दिवस सुरू असलेल्या या उपक्रमासाठी फ्रेंड्स ऑफ नेचर (फॉन) सर्पमित्र, निसर्ग संवर्धन संस्था चिरनेर, उरण, जि. रायगड अध्यक्ष रायगड भुषण जयवंत ठाकूर, उपाध्यक्ष रायगड भुषण राजेश पाटील, सचिव शेखर म्हात्रे, कु. निकेतन ठाकूर, कु.राकेश शिंदे, हिम्मत केणी, ऋषिकेश म्हात्रे सचिन घरत यांनी मेहनत घेऊन हा उपक्रम पूर्णत्वास नेण्यासाठी मोलाचे योगदान दिले.