तिवसा तालुका मंदिर विश्वस्त बैठकीत आ. वानखडेंना निवेदन

मोर्शी/त्रिफुल ढेवले,दि.3
तिवसा : श्री क्षेत्र गुरुकुंज आश्रम, मोझरी येथे तिवसा तालुका मंदिर विश्वस्थांची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीला तालुक्यातील १२५ हून अधिक विश्वस्त उपस्थित होते. बैठकीला आ. राजेश वानखेडे यांनी सुद्धा हजेरी लावली होती.
देवस्थान शेतजमीन प्रकरणांना आळा घालण्यासाठी सक्षम कायदा म्हणून अँटी लँड ग्रॅबिंग ॲक्टची तरतूद राज्य शासनाने करावी यासंदर्भातील निवेदन महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने आ. राजेश वानखडे यांना देण्यात आले. त्यांनी याबाबत राज्य शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे स्पष्ट केले. श्री महारुद्र मारोती संस्थान,जहागीरपूर येथे ९ मार्च 2025 रोजी होणाऱ्या अमरावती जिल्हा मंदिर विश्वस्त अधिवेशनाबाबत बैठकीमध्ये माहिती देण्यात आली.बैठकीचे अध्यक्षस्थान अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळ आश्रमाचे सरचिटणीस जनार्दनपंत बोथे गुरुजी यांनी भुषवले. मंदिर प्रशासन, शेत जमीन प्रकरणे व धार्मिक विषयावर अॅड. रमण जयस्वाल, महाराष्ट्र मंदिर महासंघाचे राज्य पदाधिकारी अनुप जयस्वाल, हिंदू जनजागृती तिचे जिल्हा समन्वय नीलेश टवलारे यांनी मार्गदर्शन केले. महाराष्ट्र मंदिर महासंघाद्वारे अल्पावधीमध्येच मंदिरांच्या शेतजमिनी व मंदिर संस्कृतीच्या रक्षणासाठी सुरू केलेले कार्य अत्यंत कौतुकास्पद आहे. या कार्यासाठी आम्ही सदैव महासंघाच्या सोबत राहू.त्याकरिता आमच्याकडून नेहमी सहकार्य राहील, असे मनोगत बोथे गुरुजी यांनी अध्यक्षीय भाषणात व्यक्त केले. बैठकीचे संचालन रूपेश राऊत यांनी केले.बैठकीला डॉ. राजाराम बोथे, प्रदीप गर्गे, जहागीरपूर संस्थानचे अध्यक्ष ओमप्रकाश परतानी, महासंघाचे जिल्हा संयोजक कैलाश पनपलिया, विनोद पटेल, सचिन वैद्य, गजानन जवंजाळ, राहुल तडस व इतर मंदिरांचे विश्वस्त उपस्थित होते. यासह मानवता संस्थान दासटेकडी, सोटागिर महाराज संस्थान, रामचंद्र संस्थान मोझरी, दुर्गा देवी संस्थान तळेगाव ठाकूर, श्री रामदेव बाबा दुर्गादेवी, तिवसाचे विश्वस्तही या वेळी उपस्थित होते.