जागतिक एडस दिनानिमित्त रॅलीसह विविध स्पर्धेंचे आयोजन
जालना/प्रतिनिधी,दि. 29
1डिसेंबर हा जागतिक एडस दिन म्हणून साजरा करण्यात येतो. तरी दि.1 डिसेंबर 2023 हा जागतिक एडस दिनानिमित्त युवा वर्गामध्ये एचआयव्ही, एडस संदर्भात जनजागृती निर्माण करणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने जिल्हास्तरावर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या स्पर्धेत रेड रिबन क्लबच्या सदस्यासह जास्तीत जास्त विद्यार्थी- विद्यार्थींनींनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक, सामान्य रुग्णालय, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.
1 डिसेंबर 2023 रोजी जागतिक एडस दिनानिमित्त आयोजित कार्यक्रम स्पर्धां पुढीलप्रमाणे आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालयासह सर्व ग्रामीण रुगणालये व उपजिल्हा रुग्णालय अंबड येथे 1 डिसेंबर 2023 रोजी प्रभातफेरी सकाळी 9 वाजता काढण्यात येईल. जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून एचआयव्ही/एडस जनजागृती, माझ्या स्वप्नातील भारत आणि स्त्री-पुरुष समानता या विषयावर दि.1 ते 15 डिसेंबर या कालावधीत चित्रकला, रांगोळी स्पर्धा घेण्यात येतील. तसेच कविता व निबंध लेख स्पर्धा ग्रह पृथ्वी माझे घर, माझ्या जवळच्या मित्र-मैत्रिण, माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय दिन, माझ्या स्वप्नातील भारत या विषयावर घेण्यात येईल. रेड रिबन क्लबकडून दि.1 ते 15 डिसेंबर या कालावधीत सर्व कनिष्ठ व वरिष् महाविद्यालयात मातेपासून तिच्या होणाऱ्या बाळास एचआयव्ही/एडस पासून संरक्षण, एचआयव्ही/एडसचे संक्रमणाचे मार्ग व प्रतिबंधात्मक उपाय, एचआयव्ही/एडस प्रतिबंध व कायदा -2017 तसेच एचआयव्ही/एडस जनजागृती टोल फ्री क्रमाक 1097 या विषयावर पोस्टर मेकिंग, सोशल मीडिया पोस्ट मेकिंग, डिजिटल पोस्टर, प्रश्नमंजूषा, रिल मेकिंग फेस पेंटींग, रांगोळी, निबंध लेखन, कविता लेखन व वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच याच कालावधीत तालुकास्तरावरील महाविद्यालयात व्याख्यान व माहितीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.