जालना येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पहिल्या विद्यार्थ्याने घेतला प्रवेश
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास शंभर विद्यार्थी प्रवेश क्षमतेची परवानगी ; जालना जिल्ह्याच्या वैद्यकीय शिक्षणात मोलाची भर

जालना/प्रतिनिधी,दि.16
नुकतेच उद्घाटन झालेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास यावर्षी शंभर विद्यार्थी प्रवेश क्षमतेची अधिकृत परवानगी प्राप्त झाली आहे. आज या महाविद्यालयाच्या वैद्यकीय शिक्षण विभागात पहिल्या विद्यार्थ्याने प्रवेश घेतल्याने जालना जिल्ह्याच्या वैद्यकीय शिक्षणात मोलाची भर पडली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. सुधीर चौधरी, यांनी यावेळी विद्यार्थ्यांचे स्वागत करत महाविद्यालयाच्या शैक्षणिक ध्येयधोरणांबद्दल चर्चा केली. त्यांनी सांगितले की, “या महाविद्यालयाच्या स्थापनेमुळे जालना जिल्ह्याच्या वैद्यकीय शिक्षणाची गुणवत्ता वाढेल. तसेच समाजातील विविध स्तरातील विद्यार्थ्यांना उत्तम वैद्यकीय शिक्षणाची संधी उपलब्ध होईल.”
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे यश हे केवळ महाविद्यालयाच्या प्राध्यापकवर्गाचेच नव्हे, तर विद्यार्थ्यांच्या कठोर परिश्रमांचेही फलित आहे. यापुढेही महाविद्यालय आरोग्य सेवेतील उत्कृष्टता प्राप्त करण्यासाठी कटिबद्ध राहील.
या प्रसंगी महाविद्यालयाच्या विविध विभागातील प्रमुख अधिकारी व प्राध्यापक उपस्थित होते. विद्यार्थी व पालकांनी यावेळी महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाबद्दल समाधान व्यक्त केल्याचे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जालना अधिष्ठाता डॉ. सुधीर चौधरी यांनी कळविले आहे.