हरियाना सरकारच्या धर्तीवर निवृत्ती वेतन मंजूर करा अन्यथा स्वातंत्र्य दिनापासून आंदोलन करणार – बाबासाहेब कोलते
जालना/प्रतिनिधी,दि.23
महाराष्ट्रातील स्वातंत्र्य सैनिकांच्या वारस मुला मुलींना हरियाणा सरकारच्या धर्तीवर निवृत्तीवेतन मंजूर करून नामनिर्देशित पाल्यांना शासन सेवेत १९९१ च्या शासन निर्णयाप्रमाणे समावेश करून घेण्यात यावे अन्यथा स्वातंत्र्य दिनापासून १५ ऑगस्ट महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा ईशारा स्वातंत्र्य सैनिक पाल्य समितीचे प्रदेश अध्यक्ष बाबासाहेब पाटील कोलते यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एका निवेदनाद्वारे दिला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविलेल्या निवेदनात बाबासाहेब कोलते यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्रातील स्वातंत्र्य सैनिक व वारस पत्नी मयत झालेल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या वारसांना तसेच त्यांच्या मुलामुलींना हरियाणा सरकारच्या धर्तीवर निवृत्तीवेतन मंजूर करावे कारण भारत देशातील हरियाणा सरकारने राज्यातील मयत झालेल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या वारस मुलामुलींना दि. १५ जुलै २०२४ रोजी शासन निर्णय निर्गमित करून निवृत्तीवेतन सुरु केले आहे त्याच धर्तीवर महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र राज्यातील स्वातंत्र्य सैनिकांच्या मुलामुलींना निवृत्तीवेतन मंजूर करावे. केंद्र व राज्यशासनाने स्वातंत्र्य सैनिक मयत झाल्यानंतर त्यांना मिळणारे निवृत्तीवेतन शासनाकडून नियमानुसार बंद होते परंतु मराठवाडा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्य सैनिकांच्या कार्याची नव्या पिढीला आठवण राहावी व थोर स्वातंत्र्य सैनिकांचा इतिहास हा त्यांच्या वारस मुला मुलींना कळावात्यासाठी स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटुंबातील एका वारसांना निवृत्तीवेतन वारसाने मंजूर करावे. तसेच महाराष्ट्रातील स्वातंत्र्य सैनिकांचे नामनिर्देशित पाल्य गेल्या अनेक दिवसापासून शासनाने नोकर भरतीचा शासन निर्णयच रद्द केल्यामुळे गेल्या अनेक दिवसापासून वंचित आहे. त्यामुळे स्वातंत्र्य सैनिकांच्या नामनिर्देशित पाल्यावर अन्याय झाला आहे. त्यामुळे नोकरी पासून वंचित असलेल्या नामनिर्देशित पाल्याचा सहानुभूतीपूर्वक विचार करून त्यांना शासन सेवेत समावून घेण्यासाठी तात्काळ शासन निर्णय निर्गमित करून नामनिर्देशित पाल्यांना १९९१ च्या शासन निर्णयाप्रमाणे शासन सेवेत सामावून घेण्यात यावे, याबाबत स्वातंत्र्य सैनिक पाल्य समितीच्या वतीने अनेक वेळेस निवेदने केली आहे परंतु राज्यशासनाने याबाबत कोणत्याही प्रकारची दखल न घेतल्यामुळे स्वातंत्र्य दिनापासून १५ ऑगस्टपासून महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर स्वातंत्र्य सैनिक पाल्य समितीच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा स्वातंत्र्य सैनिक पाल्य समितीचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब कोलते यांनी दिला आहे.