बालकांच्या आधारवरील बायोमेट्रीक अद्यावतीकरणासाठी मोहीम

जालना/प्रतिनिधी,दि.9
महाराष्ट्र शासनाच्या माहिती तंत्रज्ञान संचालनालयामार्फत बाल आधार नोंदणी व बायोमेट्रीक अद्यावतीकरणासाठी मोहिम दि.1 एप्रिल ते 30 जून 2025 पर्यंत राबविण्यात येत आहे. मोहिमेअंतर्गत 0 ते 5 वर्ष वयोगटातील बालकांची नवीन आधार नोंदणी व 5 ते 7 आणि 15 ते 17 वयोगटातील बालकांचे बायोमेट्रीक अद्ययावत करण्याचे उद्दीष्ट आहे. जिल्हा प्रशासन, महा-ई-सेवा केंद्र, शाळा, अंगणवाड्या आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या संयुक्त सहकार्याने ही मोहीम प्रभावीपणे राबविली जाणार आहे, तरी जिल्ह्यातील नागरिकांनी आपल्या बालकांचे नवीन आधार नोंदणी तसेच आधार अद्यावतीकरण करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
बाल आधार नोंदणी व बायोमेट्रीक अद्यावतीकरणाची मोहिम आधार केंद्रावर राबविली जाणार आहे. ज्यामध्ये शहरी, ग्रामीण व दुर्गम भागातील 0 ते 5 वयोगटातील बालकांची नवीन आधार नोंदणी व अद्यावतीकरण करण्यात येणार आहे. ज्यामध्ये चांगले काम करणारे गाव पातळीवरील उद्योजकांना प्रोत्साहन म्हणून प्रत्येक महसूल विभागातून प्रथम तीन गावपातळीसाठी अनुक्रम 1 लाख रुपये, 50 हजार रुपये व 30 हजार रुपये पारितोषिक देण्यात येणार आहे. राज्यातील लाखो बालकांची आधार नोंदणी व आधार अद्ययावत प्रक्रिया शिल्लक असून ही मोहिम त्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण आहे. या मोहिमेमुळे बालकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ सुलभतेने मिळण्यास मदत होणार आहे. असे निवासी उपजिल्हाधिकारी, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.