शासकीय तंत्रनिकेतनच्या 170 विद्यार्थ्यांची नोकरीसाठी नामांकित कंपन्यामध्ये निवड
जालना/प्रतिनिधी,दि. 20
शासनाच्या तंत्र शिक्षण विभागाअंतर्गत येणाऱ्या शासकीय तंत्रनिकेतन जालना या संस्थेतील 170 विद्यार्थ्यांची नोकरीसाठी विविध नामांकित कंपन्यामध्ये निवड झालेली आहे. यामुळे पालक-विद्यार्थी आनंद व्यक्त करत आहेत. नोकरीसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना 2.2 लाख ते 3.6 लाख रुपयांचे वार्षिक पॅकेज मिळाले आहेत.
मागील पाच वर्षापासून अभियांत्रिकी क्षेत्रात डिप्लोमा इंजिनियर्सची मागणी वाढत असल्याने या संस्थेतील 150 ते 200 मुलांना दरवर्षी चांगल्या पगाराच्या नोकऱ्या मिळत आहेत. शासकीय तंत्रनिकेतनमध्ये तीन वर्षाचा डिप्लोमा कोर्स राबविण्यात येतो. ज्यामध्ये यंत्र विद्युत, स्थापत्य, संगणक व रसायन अभियांत्रिकी या शाखांचा समावेश आहे. तसेच अल्पसंख्याक घटकाकरीता राखीव जागा आहेत. या वर्षात रिलायन्स, टाटा मोटर्स, एल अँड टी, बजाज ऑटो, सिमन्स, जॉन डियर, ग्रासिम इंडस्ट्री, जीई एव्हीएशन, फिलीप्स, डेटा स्टेक, धूत ट्रान्समिशन, एनआरबी, कालिका स्टील इत्यादी नामांकित सहभाग नोंदविला व 170 गुणवंत विद्यार्थ्यांची नोकरीसाठी निवड केली आहे, असे प्राचार्य, शासकीय तंत्रनिकेतन, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.