मोर्शीत धक्कदायक भूताच्या नावावर विवाहीतेशी अघोरीकृत्य,

मोर्शी/त्रिफुल ढेवले,दि.30
मोर्शी : मोर्शी तालुक्यात विवाहित महिलेसोबत अंगात भूत असल्याचे सांगून अघोरी कृत्य करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार करणारा महिलेचा पती, मौलाना व पतीचे दोन मित्र यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात झाला आहे. या घटनेने चांगलीच खळबळ उडाली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, सिंभोरा येथे रहात असलेल्या महिलेने तक्रार दिली की, तिच्या पतीने तिला पाळा येथी मौलानाकडे नेले. तेव्हा पतीचा मित्र तेथे हजर होता. मी गाडीतच बसून राहली, तेव्हा गाडीजवळ एक मौलाना आला व त्याने हाताची नाडी तपासून पतीच्या मित्राला पाणी आणण्यास सांगितले. पाणी आणून दिल्यावर मौलानाने मंत्र बोलून ते पाणी पिण्यास दिले. नकार दिल्याने त्यांनी ते पाणी जबरदस्तीने माझ्या तोंडामध्ये टाकले व चेहर्यावर सुध्दा शिंपडले.
पती व त्यांच्या मित्राने जबरदस्तीने मला मौलानाच्या खोपडीत नेले. मौलानाने त्याचे जवळील अत्तर माझ्या डोळयात टाकले. डोळ्याची अंगार झाल्याने त्यांच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न केला तर त्यांनी डोक्याचे केस पकडून हिच्या अंगात भूत आहे असे म्हणत त्यांच्या जवळील वाता, सरसुचे तेल, पाणी, सोप अश्या वस्तू माझ्या पतीला दिल्या. यानंतर जर हिने असा प्रकार केला तर तुम्ही हिच्या डोक्याचे केस पकडुन दिलेल्या वस्तूचा प्रयोग करायचा, असे मौलानाने सांगितले. आम्ही सिंभोरा येथे परत आलो. माझी नणंद सुध्दा घरी आली. पती व तीने मौलाना याने सांगितल्या प्रमाणे माझ्या डोळ्यासमोर वाता लावली, पाणी पाजले व सोप खाण्यास दिली. माझ्या आई-वडीलांना फोन लावण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी फोन हिसकावून घेतला. दरम्यान मी बेशुद्ध पडल्याने मला मोर्शी येथील खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले. उपचार घेऊन गावाला परत आल्यावर सुध्दा पतीने डोक्याचे केस पकडून अंगनामध्ये आपटले व मित्राला फोन करून घरी बोलावीले. हीच्या अंगात भूत आले. हिला तुम्ही घरात घेवून जा असे म्हटले.
घराशेजारील लोकांनी घरात नेले. 28 नोव्हेंबर सकाळी 11 वाजताच्या दरम्यान सिंभोरा येथील घरी दिवा लावत असताना पती विकास आंडे यांनी मनाई केली. नेहमी प्रमाणे माझ्यावर प्रयोग करणे सुरू केले. पतीने घराच्या मुख्य दरवाज्याला कुलूप लावले. परंतु, गावातील पोलिस पाटील व ईतर नागरिकांनी त्यांना दार उघडण्यास बाध्य केले, असे तक्रारीत नमुद आहे. प्राप्त तक्रारीवरून पोलिसांनी महिलेचे पती विकास अरूण आंडे व नणंद प्रणिता बोबडे, पाळा येथील मौलाना तसेच पतीचे दोन मित्र भारतीय न्यास संहितेच्या विविध कलमान्वये व महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादुटोणा कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे.