pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

25 एप्रिल रोजी जागतिक हिवताप दिन

0 1 7 7 0 6

जालना, दि.24

25 एप्रिल रोजी जागतिक हिवताप दिन

25 एप्रिल हा दिवस जगभरात जागतिक हिवताप दिन म्हणून साजरा केला जातो. या वर्षी जागतिक आरोग्य संघटनेने “Accelerating the Fight Against Malaria for a more Equitable World”, “मलेरियाविरुध्द जगाच्या संरक्षणासाठी, गतिमान करु या लढा मलेरियाला हरविण्यासाठी” हे घोषवाक्य दिलेले आहे. पावसाळा या ऋतुमध्ये जलजन्य व किटकजन्य आजारांमध्ये वाढ होते तसेच उद्रेक होतात. त्यात प्रामुख्याने डासांपासून प्रसारीत होणारे रोग अधिक असतात. डासांचा डंख जरी छोटा असला तरी त्यापासून निर्माण होणारे धोके मात्र मोठे असतात. हिवताप, डेंग्यू, चिकुनगुण्या, हत्तीरोग, जपानी मेंदूज्वर, झिका या सारखे आजार पसरवण्याचे काम डास करत असतो. जागतिक आरोग्य संघटनेने या वर्षी अशा प्रकारचा संदेश देऊन किटकजन्य आजारांचे गांभिर्य सर्वांच्या लक्षात आणून द्यायचा प्रयत्न केलेला दिसून येतो.
किटकांमार्फत अनेक प्रकारचे आजार पसरतात. त्यात माशा, पिसवा, सॅन्डफ्लाय व डास हे किटक आहेत, मात्र त्यापैकी डास हा किटक हिवताप, डेंग्यू, चिकुनगुण्या, हत्तीरोग, जपानी मेंदूज्वर या सारख्या जीवघेण्या आजारांचा प्रसार करतो. हिवताप, डेंग्यू, जपानी मेंदूज्वर या किटकजन्यरोगामध्ये रुग्णाचे वेळीच रोगनिदान व औषधोपचार न मिळाल्यास रुग्ण दगावू शकतो. हिवताप हा प्लाझमोडियम या परोपजीवी जंतुंमुळे होणारा व मादी अॅनाफिलीस डासाच्या चावण्यामुळे पसरणारा आजार आहे. डेंगी, चिकुनगुण्या व झिका हे विषाणूजन्य आजार आहेत, त्यांचा प्रसार एडीस इजिप्ती प्रकारच्या मादी डासामुळे होतो. हत्तीरोग हा वूचेरेरीया बॅनक्राफ्टी मुळे होणारा व क्यूलेक्स प्रकारच्या डासांमुळे पसरणारा आजार आहे. हे सर्व आजार वेळीच औषधोपचार करुन बरे करता येतात, मात्र वेळीच उपचार न झाल्यास प्राणघातक ठरु शकतात.
अॅनाफिलीस मादी डासांपासून पसरणाऱ्या हिवताप बाबत आपण अधिक माहिती घेऊ या.
हिवतापः-हिवताप (मलेरिया) हा प्लाझमोडियम प्रकारच्या परोपजीवी जंतूंमुळे होतो. हिवतापाचा प्रसार रोगी व्यक्तीकडून निरोगी व्यक्तीस अॅनाफिलीस प्रकारच्या मादी डास चावल्यानंतर होतो. हिवतापाची लक्षणेः थंडी वाजुन ताप येणे, डोकेदुखी, उलटी मळमळ, घाम येणे.

• हिवताप जंतूचे प्रकारः-हिवताप जंतूंचे ४ प्रकार आहेत, त्यापैकी आपल्याकडे आढळून येणारे मुख्यत्वे दोन प्रकार आहेत. १) प्लाझमोडियम व्हायवॅक्स २) प्लाझमोडियम फॅल्सीपॅरम

• हिवतापाचा उपचारः-
कुठलाही ताप हिवताप असू शकतो. त्यामुळे तापाची लक्षणे जाणवायला लागल्यानंतर जवळच्या दवाखान्यात हिवतापाची चाचणी करुन घेतली पाहिजे. तपासणीत हिवताप असल्याचे आढळून आल्यास क्लोरोक्विन, प्रायमाक्विन व ए.सी.टी. चे उपचार रुग्णांच्या प्रकारानुसार त्वरीत सुरु करण्यात येतात. एखाद्या हिवताप रुग्णास समूळ उपचार झाला नाही तर त्याच्या शरीरातील हिवतापाचे जंतू डासांमार्फत निरोगी व्यक्तीच्या शरीरात जातात परिणामी विनाउपचारीत अथवा अर्धउपचारीत हिवताप रुग्ण हिवतापाच्या प्रसारासाठी कारणीभूत ठरतो.

• हिवतापाचे नियंत्रण :-
उपचारापेक्षा प्रतिबंध हा नेहमीच प्रभावी असतो. म्हणून डासांवर नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. डास नियंत्रणासाठी खालीलप्रमाणे दक्षता घेणे आवश्यक आहे.

१) गावाच्या किंवा घराच्या सभोवताली असणारी डबकी, खड्डे बुजवावीत, गटारे वाहती करावीत.
२) इमारतीच्या टाक्या, हौद यांना घट्ट झाकणे बसवावे अथवा घट्ट कापड बांधावे.
३) पाणी साठविण्याची भांडी तीन दिवसांत एकदा रिकामी करुन घासून-पुसून कोरडी करावीत. पाण्याच्या साठ्यांची झाकणे नेहमी बंद ठेवावीत.
४) फ्रिज, कुलर, फ्लॉवर पॉट्स, कुंडया, डबे व अन्य वस्तुंमध्ये तीन दिवसांपेक्षा जास्त काळ पाणी साठून राहणार नाही याची काळजी घ्यावी. कारण अशाच पाण्याच्या साठ्यांमध्ये डासांची पैदास होते.
५) रात्री झोपतांना किटकनाशक भारीत मच्छरदाणीचा वापर करावा व शक्यतो पूर्ण अंग झाकले जाईल असे कपडे घालावेत.
६) शाळेत जाणाऱ्या मुलांसाठी डास प्रतिबंधक क्रिम वापरावे.
७) गावाभोवतालच्या मोठ्या पाण्याच्या साठ्यांमध्ये (उदा. ओढा, डबके, तलाव, मोठे हौद इ.) डास अळीभक्षक गप्पी मासे सोडण्यात यावेत.
८) स्थलांतरीत लोकांपासुन हे रोग पसरणार नाहीत याची काळजी घ्यावी.

सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत आपापल्या कार्यक्षेत्रात आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत ताप रुग्ण सर्व्हेक्षण करण्यात येते, डासांच्या घनतेचे सर्व्हेक्षण करण्यात येते, उद्रेकग्रस्त व अतिसंवेदनशील भागात किटकनाशक फवारणी व धुर फवारणी करण्यात येते, विविध जनजागृती अभियान राबविण्यात येतात. या व अशा सर्व कार्यक्रमात जनतेने आरोग्य कर्मचाऱ्यांना सहकार्य केले पाहिजे, जेणेकरुन डासांवर नियंत्रण मिळविणे शक्य होईल. त्यामुळे या उपक्रमामध्ये जनतेचा सहभाग व सहकार्य अत्यंत मोलाचे ठरते. जागतिक लोकसंख्येच्या 50 टक्के लोकसंख्या किटकजन्य आजारांसाठी संवेदनशिल आहे. डास नियंत्रणासोबतच डासांच्या चाव्यापासून आपले व आपल्या कुटुंबाचे संरक्षण प्रत्येकाने करणे आवश्यक आहे, ज्यामुळे आपल्याला डासांमुळे पसरणाऱ्या जीवघेण्या आजारांपासून दूर राहता येईल.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 7 0 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे